साक्री तालुक्यात बेदम मारहाण करीत वृध्दाचा खून १० जणांवर गुन्हा दाखल

| धुळे प्रतिनिधी ।

साक्री तालुक्यातील म्हसाळे शिवारात बेदम मारहाण करीत रुदाणेतील वृद्धाचा खून करण्यात आला. त्यांनी पोलिसात फिर्याद दिल्याच्या कारणावरून त्यांच्यावर हा हल्ला झाला. याप्रकरणी १० हल्लेखोरांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नानाभाऊ बाबू भील (वय ६२ रा. रूदाणे ता. शिंदखेडा) असे मृत वृध्दाचे नाव आहे. त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी पोलिस ठाण्यात बापू काशीनाथ भील याच्याविरूध्द फिर्याद दिली. या कारणावरून त्यांना दि. ७ रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास म्हसाळे शिवारातील अमोदे फाट्याजवळ बापू काशीनाथ भील याने कुन्हाडीने डोक्यात वार केला. तर नाना महादु भील, सुकराम पुंडलिक भील, राजू नाना भील, सोनू भाया भील, गणेश भाया भील, बहिरम नाना भील, दशरथ नारायण भील, ज्ञानेश्वर पावबा भील व जिभाऊ काशिराम भील यांनी शिवीगाळ करीत लाठ्याकाठ्या आणि हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी होऊन नानाभाऊ यांचा मृत्यू झाला. याबाबत शानाभाऊ बाब भिल याच्या फिर्यादीवरून मारहाण करणार्या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि गायकवाड करीत आहेत.