एक लाख भाविकांनी घेतले भीमाशंकराचे दर्शन

0

पुणे ः श्री क्षेत्र भीमाशंकरला महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी सुमारे एक लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. जिल्हा परिषद व महापालिकांचा निकाल गुरुवारी लागल्याने यंदा महाशिवरात्र यात्रेला मोठी गर्दी नव्हती. पहाटेच्या दर्शनासाठी मध्यरात्री बारापासूनच भाविकांची रांग लागली होती. मात्र, दिवसभर फारशी गर्दी झाली नाही.

भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव, माजी वनमंत्री बबनराव पाचपुते, देवदत्त निकम, बाळासाहेब बेंडे यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा झाली. विश्‍वस्त पुरूषोत्तम गवांदे, मधुकर गवांदे, संजय गवांदे, रत्नाकर कोडिलकर, संतोष कोडिलकर यांनी यावेळी वेदपठण केले. महाशिवरात्रीच्या पहाटे शिवलिंगाचे दर्शन घेणे पवित्र मानले जात असल्याने सकाळपर्यंत दर्शनासाठी रांग लागली होती. यंदा तरूण वर्ग मोठ्या संख्येने दिसत होता. मुंबईच्या उपनगरांमधून पायी कोकण घाट चढून भीमाशंकरमध्ये मोठ्या संख्येने तरूण आलेले होते.

मंदिराच्या गाभार्‍यात सुंदर फुलांची सजावट करण्यात आली होती. यात्रेच्या धर्तीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आरोग्य खात्याने तातडीच्या सेवेसाठी रूग्णवाहिका ठेवली होती. त्यात बसून डॉक्टर आजारी भाविकांवर उपचार करत होते.