टेलरच्या शतकामुळे न्यूझीलंडचा ६ धावांनी विजय

0

ख्राइस्टचर्च : न्यूझीलंडचा धाकड फलंदाज रॉस टेलरच्या विक्रमी शतकाच्या बळावर न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सहा धावांनी रोमहर्षक विजय संपादन केला. टेलरने ८ चौकारांसह नाबाद १०२ धावांची खेळी साकारली. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने २९० धावांचे लक्ष्य उभारले. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचे एकेक फलंदाज बाद होत गेल्याने विजयाच्या आशा मंदावल्या होत्या.

प्रीटोरियसच्या आक्रमक अर्धशतकाने चुरस
धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या विकेट सातत्याने पडल्याने आफ्रिका संघ हरण्याच्या मार्गावर होता मात्र ड्वेन प्रीटोरियसने २६ चेंडूंत अर्धशतक झळकावून विजयाच्या आशा निर्माण केल्या. शेवटी केवळ सहा धावांनी आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र दक्षिण आफ्रिकेची सलग १२ सामन्यांत विजयाची मालिका न्यूझीलंडने खंडित करून पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. न्यूझीलंडकडून डावाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकून टेलरने आपले शतक पूर्ण केले. याचप्रमाणे न्यूझीलंडकडून सर्वाधिक १७ शतके झळकावण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. नॅथन अ‍ॅस्टलने १६ शतके साकारली आहेत.