नद्यांचे गळे आवळणार्‍यांना पाडा; पाण्याची काळजी घेणारे निवडा!

0

मुंबई (तुळशीदास भोईटे)। पाणी हे जीवन आहे. आज आपल्या पाण्याची म्हणजेच जीवनाची काळजी घेणार्‍यांना निवडा; आणि जे आपल्या नद्यांचे गळे आवळतात, नद्यांच्या पात्रात अतिक्रमण करतात, नद्यांचे पाणी प्रदूषित करतात त्या सर्वांना मताधिकाराचा उपयोग करुन पाडा, असे आवाहन भारताचे ‘वॉटरमॅन’ डॉ. राजेंद्र सिंह यांनी ‘जनशक्ति’शी बोलताना मतदारांना केले.डॉ. राजेंद्र सिंह यांच्याशी जनशक्तिच्या मुंबई आवृत्तीचे संपादक तुळशीदास भोईटे यांनी संवाद साधला.

नद्या प्रदुषित करणार्‍यांना निवडणूक लढवू देऊ नये
या शतकातील सर्वात मोठे संकट हे जलप्रदूषणाचे आहे, हे त्यांनी बजावून सांगितले. मात्र पाण्यासाठी जीवन वाहिलेल्या वॉटरमॅनने स्पष्ट शब्दात पाण्याचा मुद्दा हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा ठरला नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला तो प्रचारात अग्रक्रमाने जेवढा घेतला पाहिजे होता तेवढा घेतला नाही, त्याबद्दल स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले पाण्याचे महत्व ओळखले पाहिजे. पाणी देणारी नदी आजारी पडली तर आपण आजारी पडतो. त्यामुळे अतिक्रमण करुन, प्रदूषण करुन नदीला आजारी पाडणे हा गंभीर गुन्हा मानला गेला पाहिजे. अशा गुन्हेगारांना निवडणूकही लढवू देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.

महाराष्ट्रात 74 टक्के भूजलाचा अतिउपसा
पर्यावरण रक्षण, निसर्ग संवर्धनाचे काम होत नाही. दूषित पाणी चांगल्या पाण्यात सोडले जाते. ते पिण्याचे पाणी दूषित करते. महाराष्ट्रात 74 टक्के भूजलाचे ओव्हरड्राफ्ट घेतो तसा अतिउपसा झाला आहे, त्यामुळे राज्याचे भविष्यच ‘खतरनाक’ म्हणता येईल असे झाले असल्याचेही त्यांनी सांगीतले. ही स्थिती राज्याच्या केवळ एका भागात नसून कोकण, प.महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, विदर्भ अशा सर्वच भागांमध्ये निर्माण झाल्याचे आपल्याला महाराष्ट्र दौर्‍यात लक्षात आल्याचेही ते म्हणाले.

जलयुक्तशिवार योजना ठेकेदारांच्या कचाट्यात बिघडली
महाराष्ट्रातील जलयुक्तशिवार योजना ही चांगली योजना आहे. मात्र समाजसंचालित राहण्याऐवजी ही चांगली योजना ठेकेदारांच्या कचाट्यात सापडल्याने बिघडली असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. ती पुन्हा समाजाकडून संचालित झाली, विक्रेंद्रीत जलनियोजन केले तर महाराष्ट्र पाणीदार होऊ शकेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

व्यवस्थापनाच्या बोंबाच
या राज्यात पाण्यासाठी पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर उभारल्या गेल्या आहेत. अगदी आवश्यकतेपेक्षा जास्त म्हटले तरी चालेल इतक्या. मात्र पाणी व्यवस्थापनाच्या नावाने बोंबाच आहेत. पाऊस आणि पिक यांची योग्य ती सांगड घातली गेलेली नाही. राज्यात मोठ्या प्रमाणावर जलसाक्षरता अभियान राबवण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.