महासभेत अतिक्रमणावरून वादंग

0

धुळे: धुळे महानगरपालिकेच्या महासभेत आमदार अनिल गोटे यांच्याकडून मनपाच्या कामकाजात होत असलेल्या ढवळाढवळीचा मुद्दा चांगलाच गाजला. महानगरपालिकेतील प्रशासन हे बाहेरच्या व्यक्तीच्या इशार्‍यावर काम करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोज मोरे यांनी करत आयुक्त आणि गोटे यांचे साटेलोटे असल्याचा आरोप केला. आ.गोटेंच्या इशार्‍यावर प्रशासन नाचत असल्याचे त्यांनी आहे ? असा सवाल करीत मोरे यांनी अतिक्रमण विभागाचे प्रमुख अभियंता चव्हाण यांना खडेबोल सुनावून धारेवर धरले. 2012 साली निकाल लागल्यानंतर 5 वर्ष झाली. आतापर्यंत मनपा प्रशासने स्टेशन रोड वरील जमिनदोस्त करण्यासाठी आता पर्यत काहीच कारवाई केली नाही. मात्र कुणाचा तरी फोन आल्यावर तोंडी आदेशाने अतिक्रमण काढण्यात येते आणि ताबडतोब कारवाईला पुढे सरसावते. मनपा प्रशासनाच्या या कठोर भुमिकेमुळे धुळे शहरात दंगल घडण्याची शक्यता आहे. धुळ्यातील शांतता धोक्यात येवू शकते. असा इशाराही मनोज मोरे यांनी दिला आहे.

आ.गोटेंचे अतिक्रमण का काढले नाही?
धुळे महापालिकेच्या सभागृहात महासभा सुरु होताच नगरसेवक मनोज मोरे यांनी धुळेकरांसाठी ज्वलंत असलेला अतिक्रमणाचा मुद्दा हाती घेतला. स्टेशन रोड हटविण्यासंदर्भात नोटीस कोणी दिली? स्टेशन रोडचे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात 2012 ला न्यायालयाने निकाल दिलेला असतांना 2017 पर्यंत मनपा प्रशासन झोपलेले होते का? कोणाच्या आदेशाने स्टेशनरोडचे अतिक्रमण हटवायला तुम्ही निघाले होते. अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अभियंता चव्हाण यांच्यावर केली. त्यावर चव्हाण यांनी तोंडी आदेश एव्हढेच उत्तर दिले. तोंडी आदेश कुणाचे होते? यावर चव्हाण यांनी जिल्हाधिकार्‍यांचे आदेश होते. असे सांगितले. त्यानंतर मनोज मोरे यांनी पाचकंदिल परिसरातील अतिक्रमण शिवतिर्थानजिकचे आ.गोटेंचे अतिक्रमण का काढले नाही? ते अतिक्रमण काढण्यासाठी तत्परता का दाखविली नाही. अशी विचारणा केल्यानंतर चव्हाण यांनी ‘चेक ’ करुन सांगतो असे उत्तर दिले. शासनाचे आदेश असतांना आ.गोटेंची अतिक्रमीत चौपाटी का पाडली नाही. अशी विचारणा केल्यानंतर चव्हाण यांनी चौपाटीचा प्रश्न महसुलशी संबंधीत आहे. त्यामुळे मनपा कारवाई करु शकत नाही असे सांगितले. स्वामी नारायणची भिंत पाडण्यासाठी तुम्ही कोणाच्या आदेशावरुन तेथे गेले होते. या प्रश्नावर मात्र तोंडी आदेश असे उत्तर देत चव्हाण यांनी चुप्पी साधली. आमदार अनिल गोटे यांचे तोडीपाणी केंद्र,अनाधिकृत चौपाटी,धनदांडग्यांची अतिक्रमणे प्रथम जमिनदोस्त करा, गरिबांची घरे पाडून त्यांचा संसार उघड्यावर आणण्याचे पाप करु नका, पुण्याचे कर्म करा असे प्रशासनाला मोरे यांनी सुनावले.

आम्ही केवळ शोभेचे बाहुले आहोत का?
आ.गोटे यांच्या फोनाफोनीवरुन, जिल्हाधिकार्‍यांच्या तोंडी आदेशावरुन महानगरपालिका प्रशासन काम करत असेल तर महापौर,नगरसेवक, आम्ही केवळ शोभेचे बाहुले आहोत का? असा सवाल मोरे यांनी केला. प्रशासन कोणाच्याही आदेशावर काम करीत असेल आणि तोंडी आदेशावरुन कोणतीही कारवाई करायला पुढे येत असेल तर त्यामुळे मोठा अनर्थ घडेल. धुळ्यात दंगल घडू शकते अशी भिती मोरे यांनी व्यक्त केली. अतिक्रमणाच्या प्रश्नावर येत्या आठ दिवसात पुन्हा महासभा घ्यावी. महापालिका क्षेत्रातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात धोरण ठरवावे अशी मागणीही मोरे यांनी महासभेत केली.

आमदार गोटे – आयुक्ता मध्ये साटेलोटे
आमदार गोटे-आयुक्तांमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप माजी महापौर जयश्री अहिरराव यांनी केला आहे. जय हिंद तलावाच्या अतिक्रमणा संबंधी कार्यवाही करण्यासाठी अहवाल पाठविला यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने तशा सूचना पाठविल्याने आयुक्त धायगुडे ओघात सांगून गेल्या. यावर माजी माजीमहापौर जयश्री अहिरराव नगरसेवक सतीश महाले यांनी आयुक्तांनी केलेल्या व्यक्तव्याचे प्रोसेसींग बुक मध्ये नोंद करण्यात यावी, अशी मागणी केली. आयुक्त धायगुडे मुख्यमंत्र्याच्या इशाऱ्यावर काम करतात काय? असा सवाल सुद्धा सभागृहात सदस्यांनी उपस्थित केला.

आयुक्तांनी केला खुलासा
आमदार गोटे हे जय हिंद संस्थेच्या जलतरण तलावाच्या अतिक्रमणा संदर्भात तक्रार करीत असल्याचे तिकडे लक्ष द्या या खुलाशा वर सुद्धा सभागृहात सदस्याचे समाधान झाले नाही. या वेळी माजी महापौर जयश्री आहिराव यांनी महापालिका प्रशासनाचे व आमदार गोटे चे साटेलोटे असल्याचा आरोप करीत प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मनपा सभागृह हे सार्वभौम असून शहराच्या प्रत्येक कामात मुख्यमंत्री कार्यालय हस्तक्षेप करीत असेल तर सभागृहातील सदस्याच्या अधिकाराचा ती पायमल्ली होत आहे. या वेळी संपूर्ण सभागृहाचे वातावरण तापले होते. सभागृहातील प्रत्येक सदस्यांची नाराजी आयुक्त व प्रशासनावर होती.

पत्रकबाजीच्या फंदात पडणार नाही: महाले
दरम्यान या संदर्भात, महासभेत नगरसेवक सतीश महाले हे देखील आ. गोटेंवर बरसले. खातरजमा न करता माझ्यावर अतिक्रमणाबाबत आरोप लावले जात आहेत. ही एक प्रकारची बदनामी आहे. माझे कोणतेही अतिक्रमण नाही म्हणून अतिक्रमणाचा मुद्दा पुढे करुन मला धमकावण्याचा कुणी प्रयत्न करु नये. धमकावणार्‍याला जशास तसे उत्तर देण्यास मी समर्थ आहे, पत्रकबाजीच्या फंदात मी पडणार नाही. योग्यवेळी उत्तर देईल असे सांगत सतीश महालेंनी आ. गोटें ना निशाणा बनवला. नगरसेवक महालेनी केलेल्या व्यक्त्यव्यानंतर त्याच्या भूमीकडे राजकीय सूत्रांचे लक्ष आहे.