कामांचे प्रेझेंटेशन करणारा मनसे देशातला पहिला पक्ष

0

मुंबई | गुळगुळीत कागदावर आश्वासने देऊन उपयोग काय? दिलेली वचने पाळतो कोण? मग, असल्या फालतु प्रथा का पाळायच्या. म्हणून मनसेने जाहीरनामा काढला नाही. आम्ही नाशकात जे बोललो नव्हते, तेसुद्धा केले. तसेच पाच वर्षातल्या आपल्या कामांचे प्रेझेंटेशन करणारा मनसे देशातला पहिला पक्ष असल्याचा दावा राज ठाकरे यांनी दै.जनशक्तिला दिलेल्या मुलाखतीत केला.

मनसेने नाशिकमध्ये विकास केला, मग मनसेला गळती का लागली, असा प्रश्न विचारला असता राज म्हणाले, टक्केवारीच्या गोष्टी मी करु दिल्या नाहीत. ज्यांना विकासाशी घेणेदेणे नव्हते तेच मनसे सोडून गेले. पण, ही मंडळी जाताना एकटी गेले. लोक तेव्हा ओळखता आले नाहीत. लाट असते, ओसरल्यावर करवंट्या आपोआप दिसतातच. नाशिकचे अनंत कान्हेरे मैदान माझ्या सभांना आजही फुल्ल होते. ती भाड्याची गर्दी नसते. भाड्याने लोक येतात, उत्साह नाही आणता येत, असा टोलाही त्यांनी मारला.

मुंबईच्या विकासासंदर्भात विचारले असता राज ठाकरे म्हणाले, शहर नियोजनात मी ब्रिटीशांना आदर्श मानतो. मुंबईत एकहाती सत्ता मिळाली तर नाशिकप्रमाणे विकास करता येईल. सीएसआर फंडातून शहराचा विकास करता येतो, हे मनसेने नाशिकमध्ये दाखवले. पण सीएसआरच्या नादी इतर कोणी लागत नाही, त्यात टक्केवारी मिळत नाही. मुंबई पालिकेचे वर्षाचे बजेट ३७ हजार कोटीचे, त्यातले पगारावर जातात २२ हजार कोटी, म्हणजे विकासाच्या वाट्यास येतात १५ हजार कोटी, पाच वर्षाचा हिशोब केला तर युतीकडे विकासासाठी ७५ हजार कोटी होते, पण कुठे गेले ते कळत नाही, मुंबईत तर काम काही दिसत नाही. काही केलेच नाही, नुसते ओरबडून खाल्ले. आता दाखवायला काही नाही, म्हणून शिवसेना, भाजप दोघेही भांडभांड भांडून मतदारांचे लक्ष विचलीत करीत आहेत अशी घणाघाती टीकाही राज ठाकरे यांनी यावेळी केली.

नाशिक महापालिका निवडणुकीत ८८ गुंड उभे आहेत. त्यातले सर्वाधिक उमेदवार भाजपचे असल्याचे राज म्हणाले. तसेच भाजवापले महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याची चाल खेळत आहेत, त्याची प्रक्रिया गेली काही वर्षे पद्धतशीरपणे राबवण्यात येत आहे, असा आरोपही राज यांनी परप्रांतियांसंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर केला.
मुंबई महापालिकेच्या कामगिरीबाबत विचारले असता ते म्हणाले, मुंबईत रस्ते ठेकेदार बांधतात, तसेच नाशिकमध्येही बांधतात. मग, मुंबईच्याच रस्त्यावर खड्डे का पडतात ? नाशिकमध्ये साडेअकराशे कोटीत उत्तम रस्ते होतात. मुंबईत ७५ हजार कोटीतही होत नाहीत. त्यावर उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतले अनेक रस्ते राज्य सरकारचे आहेत. या विधानाची त्यांना आठवण करुन दिली. त्यावर राज उसळून म्हणाले, सरळसरळ खोटे आहे, अपशय झाकायचा हा प्रयत्न आहे. रस्ते राज्याच्या मालकीचे मग उद्घाटनाला उध्दव का जातात, असा उलटा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा परफॉर्म्स असता, तर त्यांना थापा माराव्या लागल्या नसत्या. मुख्यमंत्र्यांना काही दाखवायला नाही, बोलायला काही नाही, त्यामुळे ते उठसूठ विरोधकांवर टिका करत आहेत. उद्योगपती रतन टाटा यांच्या सांगण्यावरुन मी गुजरातमध्ये गेलो होतो. त्यावेळी गुजरातचे तसे चित्र उभे केले होते. म्हणून मी त्यावेळी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. आज मी मोदी यांच्यावर टिका करतो. येथे प्रश्न भूमिकांचा आहे, व्यक्तीचा नाही, असे राज यांनी स्पष्ट केले.