भाजपला पाठिंबा देणार नाही, लिहून देतो

0

मुंबई । शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास राज्यात पुन्हा सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप अथवा शिवसेनेला आपला पाठिंबा देणार नाही असे स्पष्ट करताना, त्याबाबतचे पत्र लिखित स्वरुपात राज्यपालांनाही द्यायला आपण तयार आहोत, त्याचप्रकारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही लिखित स्वरुपात द्यावे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर ते आपला पाठिंबा भाजप सरकारला देणार नाहीत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शनिवारी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

निवडणुकीत भाजपकडून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च
याप्रसंगी पवारांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती असल्याच्या शिवसेनेच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. राज्य सरकार पडले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणालाही पाठिंबा देणार नाही, हे मी लिहून द्यायला तयार आहे. त्याची एक प्रत मी राज्यपालांनाही देईन. मग उद्धव ठाकरे यांनीदेखील आमचा राज्य सरकारला पाठिंबा नाही, असे लेखी स्वरूपात राज्यपालांना द्यावे. उद्धव यांनी याबद्दल स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे, असे पवारांनी म्हटले. त्यांनी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावरही पुन्हा एकदा टीका केली. नोटाबंदीमुळे लघुद्योग आणि रोजगार क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. ग्रामीण व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाले आहेत, असे पवार म्हणाले. तसेच पारदर्शकतेची भाषा करणारा भाजप महानगरपालिका निवडणुकांमध्ये खूप मोठ्याप्रमाणावर पैसा खर्च करत असल्याची टीकाही यावेळी पवार यांनी केली.

कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर!
यावेळी मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते क्लाईड कास्टो, संजय तटकरे आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना खा. शरद पवार म्हणाले, सध्या शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये ज्या पध्दतीने खालच्या पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत ते पाहता सरकार कधीही अस्थिर होऊ शकते. परंतु, एकीकडे शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा करीत असतानाच दुसरीकडे उत्तरप्रदेशमधील निवडणुकीत ज्या प्रकारे भाजपने तेथील शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा शब्द दिला आहे, तशी कर्जमाफी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची करण्याची घोषणा सरकारने केली तर राज्यातील भाजप सरकार पाच वर्षे चालू शकते असे सांगत आहेत. त्यामुळे आता भाजपला राज्यातील सरकार वाचवायचे असेल तर शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्या शिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रातील सरकार घालविण्यापेक्षा, पुन्हा निवडणुकीवर आणि जाहिरातींवर हजारो कोटींचा खर्च करण्यापेक्षा तसेच शिवसेना पक्षप्रमुखांच्या प्रकृतीचा विचार करता, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची कर्जमाफी करणे केव्हाही चांगले असे भाजपला वाटत आहे, असा टोला यावेळी खा. शरद पवार यांनी दोन्ही पक्षांना लगावला.
पुढच्या आठवड्यात सलग चार दिवस बँका बंद
मुंबई : पुढच्या आठवड्यात बँकांना 4 दिवस सुट्टी आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात मतदानासाठी मंगळवार (दि. 21) रोजी सुट्टी देण्यात आली आहे. त्यानंतर बुधवार आणि गुरुवार हे 2 दिवस बँका सुरू राहतील. त्यानंतर शुक्रवार महाशिवरात्री असल्याने बँक बंद त्यासोबतच चौथा शनिवार आल्याने ती सुट्टी आणि रविवार. अशी सलग 3 दिवस बँकेला सुट्टी असणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात तुमची बँकेची काही कामे असतील तर ती सोमवारी, बुधवार आणि गुरुवारीच आटोपून घ्या कारण इतर दिवस बँक बंद राहणार आहे.