युवा वर्ल्डकपची तयारी जोरात

0

नवी दिल्ली । 17 वर्षे गटाच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पायाभूत सुविधांची उभारणी आधीच सज्ज करण्यात आल्याची माहिती स्थानिक आयोजन समितीचे संचालक झेव्हियर सेप्पी यांनी दिली. 2017 फिफा 17 वर्षाखालील युवा फुटबॉल विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर युवा भारती क्रीडांगणाच्या उभारणी व एकंदरीत तयारीच्या प्रक्रियेवर काही किरकोळ अपवाद वगळता याआधीच फिफाच्या विशेष कमिटीने देखील समाधान व्यक्त केले आहे. 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीसारखी अखेरच्या क्षणी नाचक्की होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

सर्व स्टेडियम जागतिक दर्जाची
आयोजनाकडे भारतात फुटबॉल क्रांतीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. सर्व स्टेडियम आणि सराव स्थळे जागतिक दर्जाची असतील. याविषयी माहिती देताना सेप्पी म्हणाले, ‘फिफा 17 वर्षे गटाच्या विश्वचषकास अद्याप सात महिने शिल्लक आहेत. पण, संपूर्ण तयारी वेळेच्या आत पूर्ण करण्यात येत आहे. सर्वच स्टेडियमच्या डागडुजीचे काम एप्रिलपर्यंत संपणार आहे. भारतात पायाभूत सुविधांची सज्जता अखेरच्या क्षणापर्यंत पूर्ण होत नाही, हा समज आम्ही खोटा ठरविणार आहोत. स्टेडियममधील सांडपाणी व्यवस्था, विद्युत व्यवस्था, मीडियाबॉक्स, ड्रेसिंग रूम ही सर्व कामे वेळेच्या आत पूर्ण करण्यात येत आहेत.

सेप्पी यांची नोव्हेंबर 2014 मध्ये संचालकपदी नियुक्ती झाली. त्यावेळी काम कासवगतीने सुरू होते. त्यांच्या उपस्थितीत कामांनी वेग घेतला. डिसेंबर 2014 मध्ये फिफाच्या चमूने पाहणी दौरा केला होता. यानंतर मागच्या फेब्रुवारी आणि ऑक्टोबरमध्ये पुन्हा दोन पाहणी दौरे झाले. ही प्रक्रिया दीर्घ होती. भारतात कामाची सुरुवात व्हायला वेळ लागतो. भारतातील आयोजन अन्य राष्ट्रांच्या तुलनेत वेगळे आहे. येथे लालफितशाहीचा मोठा अडसर आहे. वेगवेगळ्या राज्य शासनांकडे मागण्या करण्यात आल्या. यातील चांगली बाब ही की सर्वच शासनांकडून जबाबदारीने सहकार्य लाभले असेही झेव्हियर सेप्पी म्हणाले.

24 संघ, 52 सामने
6 ते 28 ऑक्टोबर 2017 दरम्यान ही स्पर्धा आयोजित होणार असून दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, मडगाव, कोच्ची आणि नवी मुंबई येथे सामने होणार आहेत. या स्पर्धेत 24 संघ सहभागी होणार असून एकूण 52 सामने खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी 200 देशांतील जवळपास 20 कोटी प्रेक्षक येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या स्पर्धेसाठी फिफाच्या पथकाचे प्रमुख जेमी याझरा व सेप्पी यांच्याशिवाय फिफाच्या या पथकात ट्रेसी लू, फेलिपे रेस्ट्रेपो, विजय पार्थसारथी (स्पर्धा विभाग), ख्रिस्तियाना हॉलेरी (मार्केटिंग), जोचेम स्टेनहॉफ (माध्यम), पॉल कॉल्डर (टीव्ही), जीन पिएरे कोएल्टगन (तिकीटे), माईक फिस्टर (वरिष्ठ विकास व्यवस्थापक) व शाझी प्रभाकरन (विकास अधिकारी) यांचा समावेश आहे.