आश्राबारी गावात रस्त्याचा पत्ताच नाही

0

यावल । तालुक्यातील वड्री गावानजीकच्या धरणाजवळ आश्राबारी हे गाव वास्तव्यास आहे. हे गाव गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यापासून वंचित असल्याचे चित्र आजही पाहव्यास मिळत आहे. मागील काही महिन्यात सातोद-कोळवद ते आश्राबारी या रस्त्याचे भूमिपूजन जिल्हा परिषद व आमदार निधीतून मंजूर झाले होते. हा 8 ते 10 किमीचा रस्ता फक्त सातोद-कोळवद गावाच्या 1-2 किमी पर्यंतच झालेला आहे. त्या पुढील पूर्ण रस्ता हा मातीचा असून तो अद्यावतही पूर्ण झालेला नाही.

ग्रामस्थ अनेक सुविधांपासून वंचित

आश्राबारी गावामध्ये आदिवासी वास्तव्यास आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वीच जिल्हा परिषद व आमदार निधीतून या रस्त्याचे काम मंजूर होवून देखील या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असतो. यामुळे येथील नागरिकांना अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या गावीतील लोकांना यावल येथे बाजार करण्यासाठी यावे लागते, तसेच या गावामध्ये गेल्या बर्‍याच वर्षापासून बसची देखील सुविधा किंवा खाजगी वाहनांच्या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच या गावातील नागरिकांना तेथे रुग्णालय नसल्यामुळे देखील त्यांना तेथून सातोद किंवा यावल पर्यंत पायपीठ करावी लागते.

केळी वाहतूकदारांना सहन करावा लागतो त्रास

यावल तसेच सातोद-कोळवद ते सांगवी हा रस्ता देखील गेल्या बर्‍याच वर्षापासून खराब अवस्थेत आहे. हा रस्ता देखील जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील यांच्या शेताजवळून असून तो कोळवदपर्यंत झालेला आहे. हिवाळ्यात या रस्त्यावरुन ऊस तोड कामगार ऊस तोडीनंतर ऊसाने भरलेले वाहनाची वाहतूक त्यांना फैजपूर येथील कारखान्यात नेण्याकरीता या रस्त्यावरुन मोठी कसरत घ्यावी लागते. तसेच या रस्त्यालगत केळीचे शेत मोठ्या प्रमाणात असल्याने केळी वाहतूकदारांना खराब रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात हा रस्ता तर बंदच असतो. परंतू अजूनपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण का होवू शकले नाही? मिळालेल्या निधीचा मलीदा कोण लाटत आहे, तसेच पंचायत समिती निवडणूका असल्याने या रस्त्याचे कामाबद्दल कोणी भूमिका घेणार का? असाही प्रश्‍न सुज्ञ नागरिक करीत आहे.