लोकन्यायालयात तडजोडीअंती 15 लाखांचा दंड वसूल

0

भुसावळ । शहरातील अतिरीक्त सत्र न्यायालयात शनिवार 11 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास लोकन्यायालयाचे उद्घाटन तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश वर्ग -1 एस.के. कुलकणी यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये एकूण सात पॅनल उभारण्यात आले होते. यामध्ये एकूण 15 लाख 9 हजार 979 रुपये वसूल करण्यात आले. या लोकन्यायालयात जिल्हा न्यायाधिश वर्ग 2 पी.आर क्षित्रे, सह दिवाणी न्या. बी.डी. पवार, दिवाणी न्याययाधीश ‘क’ स्तर पी.बी.वराडे, दुसरे सह दिवाणी न्या. एम. एम. बवरे, तिसरे सह दिवाणी न्या.पी.ए. पाटील, चौथे सहदिवाणी न्या.पी.आर. कुंवर, न्या. एस.एल. वैद्य आदी उपस्थित होते. यांच्या पथकाने या खटल्यांचे कामकाज केले.

पालिकेने सादर केले 200 खटले

या लोकन्यायालयात दिवसभरात 715 रेग्युलर खटल्यापैकी 58 तडजोड करण्यात आले. तर 512 दावा दाखल पुर्व खटल्यांपैकी 9 तडजोड करण्यात आले. अशा एकूण 1227 पैकी 67 खटले निकाली काढण्यात आले. यामध्ये रेग्युलर खटल्यांमध्ये 8 लाख 36 हजार 102 रुपये, दावा दाखल पुर्व खटल्यांमध्ये 6 लाख 73 हजार 877 रुपये असे एकूण 15 लाख 9 हजार 979 रुपये वसूल करण्यात आले. दरम्यान पालिकेतर्फे लोकन्यायालयात तडजोडीसाठी 200 वर खटले ठेवण्यात आले होते. नवीन बांधकामाच्या प्रकरणात 10 ते 12 टक्के रक्कम कमी करण्यात आली. यशस्वीतेसाठी अधिक्षक डी.आय. वाणी, वरिष्ठ लिपीक पी.एस. निंभोरे, कनिष्ठ लिपीक किशोर पिंगाणे, चारुदत्त देशमुख यांनी सहकार्य केले.