75 लाखांचा माल लुटला : परप्रांतीय टोळी धुळे एलसीबीच्या जाळ्यात

कंटेनर चालकाचे अपहरण करून झाली होती लूट :: चोरीचा माल खरेदी करणार्‍यांना बेड्या

धुळे : सुमारे 75 लाखांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह स्पेअर पार्ट घेवून दिल्लीहून औरंगाबादकडे कंटेनर निघाल्यानंतर रस्त्यातच कंटेनर चालकाचे अपहरण करून मालाची लूट करण्यात आली होती. 16 जुलै 2021 रोजी हा गुन्हा घडल्याप्रकरणी थाळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा उलगडा करीत चौघा परप्रांतीय आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. जमशेद खान दिनू खान (पिरगढी, ता.जि.पलवल), अब्बास युसूफ खान (गोधोला, जि.नुह, हरीयाणा), शशीकांत धरणीधर उपाध्याय (रा.पांडेसरा, जि.सुरत, गुजरात), अरुणकुमार रमाशंकर पांडे (रा.कडोदरा, सुरत, गुजरात) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून 68 लाख 82 हजार 676 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना 3 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शीतपेयातून दिले गुंगीचे औषध
कंटेनर चालक रामदास हदयाल पाल हे दिल्लीहून सुमारे 75 लाखांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह स्पेअर पार्ट घेवून औरंगाबादकडे कंटेनर (एच.आर.55 एल.9002) ने निघाले असता दिल्लीपूर्वी एकाने धुळे येथे जायचे सांगत कंटेनर चालकासोबत प्रवास सुरू केला. मध्यप्रदेशातील शिवपूर ढाब्यावर जेवणादरम्यान कंटेनर चालकास शीतपेयातून गुंगीच औषध देण्यात आल्याने चालक रामदास पाल यांची शुद्ध हरपली व कंटेनर थाळनेर हद्दीत आल्यानंतर कंटेनरचा जीपीएस कट करण्यात आला व कंटेनर नवापूरमार्गे कुठेतरी नेण्यात आल्यानंतर वाहनातील माल उतरवण्यात आला. या प्रकरणी थाळनेर पोलिसात भाग पाच गुरनं.52/2021, भादंवि 379, 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

धुळे गुन्हे शाखेने उघडकीस आणला गुन्हा
धुळे गुन्हे शाखेने गुन्ह्याचे तांत्रिक विश्‍लेषण करीत हा गुन्हा पलवल, जि. पुरहाना, हरीयाणा येथील जमशेद खान दिनू खान व अब्बास खान (पलवल, हरीयाणा) यांनी केल्याचा संशय असल्याने पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने दोघांना चौकशीकामी ताब्यात घेतले. दोघा संशयीतांनी अन्य साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर गुन्ह्यातील मुद्देमाल हा सुरत येथील शशिकांत उपाध्याय व अरुण कुमार पांडे यांच्याकडे ठेवला असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनाही सुरत येथून ताब्यात घेण्यात आले. चोरीस गेलेल्या माला पैकी एकूण 66 लाख 82 हजार 676 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, अटकेतील आरोपींना 30 रोजी अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर केले असता 3 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा गुन्हा धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, योगेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल संजय पाटील, संदीप पाटील, पोलीस नाईक कुणाल पाटील, संदीप शरद, रवीकिरण राठोड, रवींद्र महाडिक, विशाल पाटील, सुनील पाटील, मनोज महाजन, मनोज बागुल आदींच्या पथकाने उघडकीस आणला.

Copy