लोहारा-कुर्‍हाड जि.प.गटात तिरंगी लढत चुरशीची

0

लोहारा, ता.पाचोरा । लोहारा-कुर्‍हाड गटावर आजवर काँगे्रस व शिवसेनेचे अधुनमधून वर्चस्व राहिलेले आहे. या गटात प्रथमच भारतीय जनता पक्ष कमळ या चिन्हावर निवडणूक लढवीत असल्याने यावेळी यागटात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपा अशी तिरंगी लढत होत असून या तिरंगी लढतीमुळे या गटात कमालीची चुरस निर्माण झाली आहे.

या गटाचा पूर्व इतिहास बघीतल्यास एकोकाळी या गटातून जिल्हा परिषदेचे विरोधी गट नेते व ज्येष्ठ समाजवादी नेते आण्णासाहेब शरद त्र्यंबक पाटील यांनी यागटाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच काँगे्रस पक्षातर्फे सुनिता राजेंद्र शेळके यांनी महिला व बालकल्याण समिती सभापतीपद भुषविले आहे. तसेच शिवसेनेकडून रेखा दिपकसिंग राजपूत यांनीही जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद भुषवलेले आहे व त्या यावेळी पुन्हा शिवसेनेकडून या गटात उमेदवारी करीत आहेत. गेल्यावेळी या गटातून काँग्रेसतर्फे शांताराम सोनजी पाटील हे निवडूण आले होते. यावेळी हा गट महिलांसाठी राखीव झाल्याने शांताराम पाटील यांनी यावेळी त्यांच्या सुनबाई अर्चना संजय पाटील यांना भाजपाच्या तिकीटावर उमेदवारी मिळवून दिली आहे. त्यामुळे शांताराम पाटील यांनी काँगे्रस पक्षाशी केलेली गद्दारी मतदार यावेळी स्वीकारणार का? याकडेही जानकारांचे लक्ष लागलेले आहे.

यावेळी यागटासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाची जिल्हा परिषदेच्या जागेसाठी व लोहारा प.स.गणासाठी आघाडी जरी झाली असली, तरी याच गटासाठी कुर्‍हाड पं.स.गणामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार हे स्वतंत्रपणे एकमेकाच्या विरोधात लढतांना दिसून येत आहेत. त्यामुळे या गटात अर्ध बीघाडी झाल्याचे दिसून येत आहे.

यागटात जिल्हा परिषद जागेसाठी भाजपाकडून अर्चना पाटील, शिवसेनेकडून रेखा दिपकसिंग राजपूत तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वंदना अशोक चौधरी अशी तिरंगी लढत होत आहे. तिघही उमेदवारांचे प्रचार जोरदार सुरु असून ही लढत अत्यंत चुरशीची होणार हे निश्‍चितच.

त्याचप्रमाणे लोहारा पंचायत समिती गणात देखील राष्ट्रवादी काँगे्रसतर्फे रंजना सुरेश चौधरी, शिवसेनेकडून सावित्रीबाई विठ्ठल क्षिरसागर व भाजपाकडून अनिता कैलास चौधरी या आपले नशीब आजमावीत आहे. तर कुर्‍हाड पंचातय समिती गणात पंचरंगी लढत होत आहे. या गणात शिवसेनेकडून ज्ञानेश्‍वर सोनार, राष्ट्रवादीतर्फे शांमकांत पाटील, भाजपातर्फे संतोष भिका चौधरी, काँगे्रसतर्फे धनराज राजू पाटील व अपक्ष कादकर रशीद शब्बीर हे आपले नशीब आजमवीत
आहे.