मालकातर गावात 72 हजाराचा अवैध दारूसाठा जप्त

0

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगवी पोलिसांची कारवाई

शिरपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश राज्यातून अवैध मद्य, शस्र तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यातूनच मिळालेल्या गोपनिय माहितीवरून मध्यप्रदेश सीमेलगत मालकातर गावात कारवाई करून 72 हजार किमतीचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर असे, मध्य प्रदेशाच्या पानसेमल परिसरातून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारुचा साठा महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या गावांमध्ये पाठविला जात असल्याची गोपनिय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार 2 ऑक्टोबर रोजी शिरपूर तालुका हद्दीतील सीमेलगतच्या मालकातर गावात छापा टाकला होता. त्यात लुका कांजर्‍या पावरा (वय 25, रा. मालकातर) याने त्याच्या घरात मागे लपविलेला मध्यप्रदेश निर्मिती 72 हजार रुपये किमतीचा देशी-विदेशी (इम्पेरियल ब्ल्यू आणि टँगो पंच) नावाचा दारूसाठा आढळून आला आहे. तो दारुसाठा तालुका पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई योगेश दाभाडे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार प्रकाश मोरे करीत आहे. ही कारवाईची मोहीम पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ, शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पीएसआय दीपक वारे, पोलीस लक्ष्मण गवळी, प्रकाश मोरे, संजय माळी, संजीव जाधव, संतोष देवरे, योगेश दाभाडे, योगेश मोरे, राजीव गीते व महिला पोलीस शिपाई अश्विनी चौधरी व सुनीता पवार यांनी बजावली.

Copy