72 तासांकरिता इव्हीएम आम्हाला द्या!

0

नवी दिल्ली : मध्यप्रदेशातील अटेर येथे इव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक दाखविताना कोणतेही बटण दाबले की मत भाजपालाच पडत असल्याबद्दल आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगालाच आव्हान दिले आहे. केवळ 72 तासांकरिता इव्हीएम मशीन आमच्या ताब्यात देऊन पहा, आम्ही या यंत्रात बदल करून दाखवतो, असा दावा केजरीवाल यांनी केला. उत्तरप्रदेशात भाजपने इव्हीएममध्ये घोटाळा केला. मध्यप्रदेशातील निवडणुकीत इव्हीएममधून भाजपच्याच उमेदवारांचे नाव कसे बाहेर येत आहे. निवडणुकीनंतर 45 दिवस या यंत्रांचा वापर करता येत नसताना हीच यंत्रे मध्यप्रदेशातील निवडणुकीत कशी काय वापरली जात आहेत? अशा प्रश्‍नांची सरबत्तीही केजरीवाल यांनी केली.

इव्हीएममध्ये बदल करता येत असल्याचा दावा
पत्रकारांना प्रात्यक्षिक दाखविताना इव्हीएम मशीनचे कोणतेही बटण दाखले की, मत भाजपालाच जात होते. भिंड येथे घडलेल्या प्रकाराबाबत निवडणूक आयोगाने माहिती सार्वजनिक करावी. इव्हीएम मशीनमध्ये काहीही बदल करता येत नाही. मतदान फिरवता येत नाही. कुणीही मशीन रीड आणि राईट मारू शकत नाही, असे आयोगाचे म्हणणे असेल तर आयोगाने केवळ 72 तासांकरिता ही यंत्रे आमच्या ताब्यात द्यावीत. आम्ही हा तांत्रिक बदल करून दाखवतो, असा दावाही केजरीवाल यांनी केला. मशीनमध्ये भाजपने फेरफार केले असून, यापुढील मतदान मतदान पत्रिकेद्वारेच घेण्यात यावे, अशी मागणीही केजरीवालांनी केली.

निवडणूक आयोगाला काढला चिमटा
पंजाबमधील पराभवाबद्दल निवडणूक आयोगाने केजरीवालांना चिमटा काढला होता; तसेच आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला होता. आयोगाच्या या राजकीय सल्ल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, अशी खोचक टिप्पणीही केजरीवाल यांनी केली. निवडणूक आयुक्तांनी आमच्या राजकीय सल्लागार समितीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी दिले. मध्यप्रदेशातील मतदान यंत्रांत गडबड झाली असल्याचा आरोप काँग्रेस व आम आदमी पक्षाने केला असून, या निवडणुकीत ही यंत्रे वापरू नयेत, अशी मागणी केली आहे. इव्हीएममध्ये गडबड केली गेल्याचे पुरावेदेखील या दोन पक्षांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेले आहेत.