71 गुंठ्यामधील मका आगीत जळून खाक

0

शिंदखेडा: माळीच शिवारात अचानक लागलेल्या आगीने सिताराम कडू पाटील यांच्या मालकीच्या 71 गुंठे क्षेत्रातील मका पिक व लगतच्या वासुदेव निंबा पाटील यांच्या 72 गुंठे क्षेत्रातील पीव्हीसी पाईप लाईन व ठिबक सिंचनच्या नळ्या पुर्णपणे जळून खाक झाल्याची घटना शनिवार, 25 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. दुपारी अचानक लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्या संजीवनी सिसोदे व पंचायत समिती सदस्य बलूदादा राजेश पाटील हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आ.जयकुमार रावळ यांना घटनेची संपूर्ण माहिती मोबाईलद्वारा दिली. त्यांनी तात्काळ नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना सुचना दिल्या.

नरडाणा मंडल अधिकारी महेश कुमार शास्त्री, माळीच तलाठी रिना खिल्लारे व नरडाणा पोलीस स्टेशनचे पोलीस प्रतिनिधी तात्काळ घटनास्थळी हजर झाले. पूर्ण तयार झालेले मका पिक कापून शेतात ठेवलेले असताना अचानक आग लागली. त्यामुळे तयार मका व जनावरांचा चारा असे दुहेरी नुकसान होवून हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला. शेजारच्या वासुदेव पाटील यांच्या शेतातील गहू नुकताच काढला होता. त्यामुळे गव्हाचे नुकसान टळले. पण नवीनच केलेली पीव्हीसी पाईपलाईन व ठिबक सिंचनच्या नळ्या पुर्णपणे जळून खाक झाल्या. लगतच्या सर्वच शेतातील पिक कापणीला तयार होते. आग लवकर नियंत्रण आल्यामुळे नुकसान टळले. अन्यथा मोठी हानी झाली असती. झालेले नुकसान बघून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे पिक कापणीला मजूर मिळत नव्हते. आता कापणी केली तर पिकच जळून खाक झाले.

दरम्यान, सतत चार वर्षे दुष्काळ, मागीलवर्षी अतिवृष्टी आणि आता कोरोना महामारी अशा सततच्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. किमान आता तरी व्यवस्थित पंचनामा करून शासनाने झालेल्या नुकसानीचा पुर्ण मोबदला द्यावा, अशी मागणी सिताराम पाटील व वासुदेव पाटील यांनी केली आहे.

पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकारी बरोबर माळीच गावातील सरपंच कुसुम ठाकरे, पोलीस पाटील रवींद्र देसले, गणेश पाटील, विश्वास पाटील, दत्तात्रय पाटील, ज्ञानेश्वर माळी, नंदलाल पाटील व सिध्दार्थ सिसोदे उपस्थित होते.

Copy