धुळे जिल्ह्यात ६ लाख मुलांना जंतनाशक गोळ्यांचे होणार वितरण

0

धुळे । धुळे जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील ५  लाख ९४ हजार ५६० मुला- मुलींना राष्ट्रीय जंतनाशक दिवसानिमित्त शुक्रवार, १० फेब्रुवारी २०१७ रोजी लाभ दिला जाणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने सूक्ष्म नियोजन करीत प्रत्येक लाभार्थ्याला या मोहिमेचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी येथे दिले. राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यदल समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात झाली. त्यावेळी देशमुख बोलत होते.

अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, नोडल शिक्षक व कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण वर्ग

राष्ट्रीय जंतनाशक दिवशी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला- मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा उद्देश आहे. १० फेब्रुवारीला जे मुले- मुली या मोहिमेपासून वंचित राहिले असतील त्यांना १५ फेब्रुवारी २०१७ या मॉप दिनी या गोळीचा लाभ देण्यात येईल, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांनी नमूद केले. या मोहिमेसाठी गोळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे. त्यांचे वितरण करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या यांच्यासह नोडल शिक्षक व संबंधित कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले आहेत.

वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव

मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांनी सांगितले, जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वर्षे वयोगटातील ६८ टक्के मुले असून त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणार्‍या परजीवी जंतूपासून धोका आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव आहे. या कृमी दोषांचा संसर्ग दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहजतेने होतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमी दोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमी दोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहेच तसेच बालकांची बौध्दिक व शारीरिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते.

अधिकार्‍यांची उपस्थिती

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. तडवी (महिला व बालकल्याण), जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अरविंद मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय शिंदे, जिल्हा माता- बाल संगोपन अधिकारी डॉ. आर. व्ही. पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.