दुकानाचा तळभाग फुटला !

0

जळगाव । शहरातील महात्मा गांधी मार्केटमध्ये असणार्‍या तुलसी साडी सेन्टर दुकानाचा तळभाग अचानक फुटल्याने दुकानदाराची धावपळ उडाली होती. फुटलेल्या भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु होता. गांधी मार्केटचा बराचसाभाग वाहत असलेल्या पाण्याने भरलेला होता. गटारीतील पाणी दुकानात शिरल्यामुळे दुकानातील साड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

चेंबर साफ नसल्यामुळे घटना
महात्मा गांधी मार्केटमध्ये मदनलाल प्यारेलाल डहारा, राकेश डहारा यांच्या मालकीचे तुलसी साडी म्हणून दुकान असून गेल्या तीस वर्षापासून येथील व्यावसायधारक व्यापारी व्यवसाय करीत आहे. दुकानाच्या वरच्या भागात काही रहिवासी राहतात त्याच्या घरातले सांडपाणी दुकानाच्या खालच्या भागात असलेल्या एका चेंबरमध्ये जमा होते. या सांडपाण्याद्वारे घरातील घाण पाणी बर्‍याच दिवसांपासून साफसफाई नसल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी चेंबरच्या व्यतीरिक्त जागा नसल्यामुळे तुलसी साडीच्या दुकानाचा तळभाग फुटून मोठा उद्रेक होऊन पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता.

जीवित हानी टळली; महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी केली पाहणी
सकाळी विक्री केलेल्या साड्या ग्राहकांना दाखविल्यानंतर साड्या दुकानात परत रचत असतांना दुकानाचा तळभाग फुटल्यमुळे संपूर्ण दुकानात पाण्याखाली आले होते. घटनास्थळी दुकान मालक व एकूण चार माणसे काम करीत असतांना मात्र सुदैवाने कामावर असलेल्या माणसाने सतर्कता बाळगल्याने एका पाठोपाठ सगळ्यांना दुकानाच्या बाहेर काढण्यात यश आले. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. घटना झालेल्याचे समजताच स्थानिक नागरिक व व्यापारी देखील मदतीस धावून आले. गांधी मार्केट ठिकाणी झालेल्या घटनेनंतर महापालिकेचे आरोग्य अधिकारी विकास पाटील, ठेकेदार कांबळे यांनी पाहणी केली.

स्वच्छता व सुविधाचा मार्केटमध्ये अभाव
व्यापार्‍यांच्या सांगण्यानुसार महिन्या भरापूर्वी महापालिकेच्या अधिकार्‍यांकडे तोंडी तक्रार केली होती. मात्र महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची साफसफाई महात्मा गांधी मार्केटमध्ये करण्यात आलेली नाही. जर महापालिकेच्या अधिकार्‍या वेळेवर सतर्कता बाळगून कार्यवाही केली असती तर अशी घटना झाली नसती. महापालिकेच्या चालढकल कारभाराबद्दल मार्केट मधील व्यापार्‍यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. दरवर्षी महापालिकेला दुकानाचा विविध कर भरावा लागतो, मात्र सुविधा मिळत नसल्याची नाराजी व्यापार्‍यांमध्ये आहे.