Private Advt

608 मस्जिद, 370 मंदिरांवरील भोंग्यांना अटी-शर्थीच्या अधीन राहून परवानगी : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे

जळगाव : पोलिसांकडे भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावण्यासाठी अर्ज केलेल्या 608 मस्जिद आणि 370 मंदिरांना अटी, शर्थीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली असून दिलेल्या वेळेतच ते वाजवता येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे म्हणाले. जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येत असून दिलेल्या वेळेतच भोंगे व लाऊडस्पीकर वाजविता येणार आहे, नियमांचे उल्लंघण केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गुरूवार, 5 मे रोजी दुपारी आयोजित पत्रकार परीषदेत डॉ.मुंढे यांनी दिली.प्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले उपस्थित होते.

नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होणार
धार्मिक स्थळांवरील भोंग्याबाबत राज्य सरकारने पाऊले टाकली असून पोलिस प्रशासन कामाला लागले आहे. धार्मिक स्थळांवर भोंगे आणि लाऊडस्पीकर लावण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांची जळगाव जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार असल्याचे अधीक्षक म्हणाले.

अटी-शर्थीच्या अधीन राहून परवानगी
पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे म्हणाले की, पोलिस प्रशासनाकडे उपलब्ध माहितीनुसा, जळगाव जिल्ह्यात 663 मस्जिद असून त्यापैकी 608 मस्जिदींना परवानगी देण्यात आली. 11 मस्जिदींवर भोंगे लावले नसल्याचे ट्रस्टने कळविले आहे तसेच 44 मस्जिदींना परवानगी देण्याचे काम अद्याप बाकी असून येत्या दोन दिवसात ते पूर्ण केले जाणार आहे. जिल्ह्यात दोन हजार 819 मंदिरे असल्याची पोलिसांकडे माहिती असून त्यापैकी अर्ज केलेल्या 370 मंदिरांना लाऊडस्पीकर वाजविण्याची परवानगी देण्यात आली. जिल्ह्यात जो मागेल त्यांना अटी, शर्थीच्या अधीन राहून परवानगी देण्याचे धोरण जिल्हा पोलीस प्रशासनाचे आहे. कुणी विना परवानगी असल्यास त्यांना मुभा दिली जाणार नाही जर कुणी आढळून आले तर पोलिस कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सांगितले.