60 वर्षांच्या ज्येष्ठांस सवलत!

0

धुळे । ज्येष्ठ नागरिक समाजाची प्रेरणा आहेत. ते समाजाचा ठेवा असून त्यांच्याजवळील अनुभव व ज्ञानाचा आपण लाभ करुन घेतला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांसाठी पर्यटन विकास महामंडळातर्फे आता 65 वर्षाऐवजी 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकास सवलत देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी येथे केले. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) 32 वे वार्षिक अधिवेशन आजपासून धुळे येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात सुरू झाले. त्याचे उदघाटन मंत्री रावल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ज्येष्ठांचा सत्कार
प्राचार्य भदाणे यांनी प्रास्ताविकपर भाषणात अधिवेशनाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ज्येष्ठांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्री रावल यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यांच्यामुळे याबाबत मुख्यमंत्री महोदयांबरोबर भेटही झाली आहे. आगामी काळात ते मागण्या मार्गी लावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी बाबू लोटू मुसळे (वय 102), श्री. परांजपे (सांगली), रामभाऊ उखर्डू पाटील (रावेर) यांचा मंत्री रावल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुरेश पोतदार, प्रा. भगवान पाटील, अश्विनी गरुड, प्राचार्या अहिरराव यांनी सूत्रसंचालन केले.

ज्येष्ठांचा अनुभव मोलाचा
मंत्री रावल म्हणाले, आमचे आजोबा दादासाहेब रावल ज्येष्ठ नागरिक संघाचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्‍या परिसंवादात सहभागी होत असत. तेव्हापासून ज्येष्ठ नागरिक संघाची माहिती मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करीत आपले विश्व साकारलेले असते. त्यांचा अनुभव मोलाचा आहे. त्यांचा उपयोग आपण करुन घेतला पाहिजे. त्यासाठी शासकीय पातळीवरुनही विचार करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांसंदर्भात पदाधिकार्‍यांची मुख्यमंत्री महोदयांबरोबर भेट घेण्यात येईल. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणार्‍या लोकराज्य मासिकातून एक पान किंवा वर्षभरातून एक अंक ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रकाशित करण्यात येईल.

छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन
यावेळी फेस्कॉमचे अध्यक्ष द. तु. चौधरी, माजी आमदार प्रा. शरद पाटील, उद्योगपती सरकारसाहेब रावल, प्राचार्य व्ही. के. भदाणे, अरुण रोडे, अरविंद कुलकर्णी, नानासाहेब इंगळे, अण्णासाहेब टेकाळे, जी. एल. पाटील, धनंजय ठाकरे, अशोक केळकर, बी. एन. पाटील, डी. एन. चापके, प्रभाकर पाटोळे, डॉ. माया कुलकर्णी, स्वागताध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांच्यासह फेस्कॉमचे पदाधिकारी उपस्थित होते., यावेळी मान्यवरांच्या हस्ते अधिवेशनानिमित्त तयार करण्यात आलेल्या ॠज्येष्ठराजॠ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी धुळे शाखेने भरविलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन मंत्री रावल यांच्या हस्ते झाले. या अधिवेशनासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशांचे वाचन प्राचार्य सुनंदा अहिरराव यांनी केले.

मोबाईल विकसित
आज ज्येष्ठ नागरिक असलेल्यांनी प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल केली. ही वाटचाल आजच्या परिस्थितीत सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी फर्स्ट इमिजेट रिस्पॉन्स मोबाईल प विकसित करण्यात येत आहे. त्यातून या क्रमांकावर संपर्क साधल्यास ज्येष्ठ नागरिकांना तत्काळ प्रतिसाद मिळेल, अशी व्यवस्था करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजना, समित्यांवर ज्येष्ठ नागरिकांमधून एक महिला व एक पुरुष प्रतिनिधी नियुक्त करण्याबाबत नियमात दुरुस्ती करण्यात येईल. समाजकल्याण विभागातर्फे विविध शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी बागेत किंवा ते सूचवतील तेथे बाक ठेवण्याचे नियोजन करण्यात येईल, असेही मंत्री रावल यांनी सांगितले.