लष्करात नवा घोटाळा; चक्क पाकव्याप्त जमीन दाखवली भाड्याने !

0

नवी दिल्ली । अनेक जवानांनी लष्करी अधिकार्‍यांच्या गैरकृत्यांच्या बाबी चव्हाट्यावर आणल्याने उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आता चक्क काही अधिकार्‍यांनी पाकव्याप्त काश्मिरमधील जमीन भाड्याने घेतल्याचे दाखवून मलीदा लाटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या 16 वर्षांपासून हा प्रकार बिनदिक्कतपणे सुरू असून या प्रकरणी आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल करुन जमिनीची खोटी कागदपत्रे घेऊन पैशांचा अपहार करणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात एका इंग्रजी वृत्तपत्राने सविस्तर वृत्त प्रकाशित केले आहे.

अनेकांचा सहभाग

‘2000 साली तत्कालीन सब डिविजनस एस्टेट ऑफिसर (जम्मू काश्मीरच्या राजौरीमधील) आर. एस. चंदेरवंशी, नौशारातील खंभा गावचे पटवारी दर्शन कुमार, राजेश कुमार आणि अन्य लोकांनी मिळून हा कट रचल्याची माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासातून समोर आली आहे. या कटानुसार विभिन्न जमिनी लष्करासाठी भाड्याने उपलब्ध असल्याचे दाखवण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात या सर्व पाकव्याप्त काश्मीरमध्ये दाखवण्यात आल्या,’ अशी धक्कादायक माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील सूत्रांनी दिली आहे.

सन 2000पासून दिले जाते भाडे

गेल्या 16 वर्षांपासून म्हणजेच ‘2000 सालानंतर लाखो रुपये भाड्यापोटी देण्यात आले आहेत,’ अशी माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील सूत्रांनी दिली असल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे. ‘1969-70 च्या रजिस्टरनुसार पाकव्याप्त काश्मीरमधील मकबूजा येथील काही भागातील जमिनीसाठी संरक्षण मंत्रालयाकडून भाडे दिले जाते आहे. या जमिनीच्या मालकाला संरक्षण मंत्रालयाकडून भाडे दिले जाते आहे. मात्र या जमिनीचा मालक खरंच अस्तित्वात आहे की तो फक्त कागदोपत्री दाखवण्यात आला आहे, याचा तपास आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग करणार आहे.

पाक जवानांचे टोमणे

दरम्यान, भारतीय लष्करातील गैरप्रकारांवर पाक लष्करातील जवान आपल्या जवानांना टोमणे मारत असल्याची बाबदेखील समोर आली आहे. ‘गुजरातमधील सीमेवर ज्या ठिकाणी भारत आणि पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या समोरासमोर आहेत, त्या भागात पाकिस्तानी रेंजर भारतीय जवानांना टोमणे मारत आहेत. तुम्हाला भूक लागली असेल, तर इकडे या. आमच्याकडे जेवण आहे,’ अशा शब्दांमध्ये बाडमेर सीमेवर भारतीय जवानांची खिल्ली उडवली जात असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या एका अधिकार्‍याने दिली आहे. भारतीय जवानांनी समाज माध्यमांवर अशाप्रकारे तक्रारी दाखल केल्याने सैन्य आणि निमलष्करी दलाच्या प्रतिमेवर परिणाम झाल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे. पाकिस्तानची गुप्तहेर यंत्रणा आयएसआय आणि सीमेपलीकडील दहशतवादी संघटना भारतीय जवानांकडून समाज माध्यमांवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टचा गैरफायदा घेऊ शकतात, असे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे.