बांगलादेशविरुद्ध सराव सामन्यात तिघांनी ठोकली शतके

0

हैदराबाद : भारत ‘अ’ संघाने दोनदिवसीय सराव सामन्यात बांगलादेशविरुद्ध जबरदस्त वर्चस्व गाजवले. या सामन्यात भारत अ संघाकडून प्रियांक पांचाळ, श्रेयस अय्यर व विजय शंकरच्या धडाकेबाज शतकांच्या बळावर संघाने ६ बाद ४६१ धावा चोपल्या. अनिकेत चौधरीच्या अचूक माऱ्यानंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारत अ संघाने गोलंदाजीत वर्चस्व गाजविले. बांगलादेश संघाने नियमित अंतरात विकेट गमावल्यानंतर त्यांनी ६७ षटकांत ८ बाद २२४ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. बांगलादेशतर्फे सौम्या सरकार (५२) आणि कर्णधार मुशफिकुर रहीम (५८) यांनी अर्धशतके झळकावली. शब्बीर रहमान (३३) व महमुदुल्लाह (२३) यांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयश आले, तर लिटन दास २३ धावा काढून नाबाद राहिला. डावखुरा वेगवान गोलंदाज अनिकेतने अचूक मारा करताना २६ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले.

तिघेही शतकवीर राहिले नाबाद
प्रत्युत्तरात खेळताना भारत ‘अ’ संघाने सलामीवीर फलंदाज व कर्णधार अभिनव मुकुंदच्या (१६) मोबदल्यात दिवसअखेर १ बाद ९१ धावांची मजल मारली होती. यंदाच्या रणजी मोसमात सर्वाधिक धावा फटकावणारा सलामीवीर प्रियांक पांचाल ४० धावांवर खेळत होता. त्याला दुसऱ्या टोकाकडून श्रेयस अय्यर (२९) साथ देत होता. यानंतर दोघांनी आपापली शतके पूर्ण करत जबरदस्त सुरुवात करून दिली. प्रियांक १०३ तर श्रेयस १०० धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन परत गेले. यानंतर मधली फळी ढेपाळली असता आठव्या क्रमांकावर आलेल्या विजय शंकरने आपल्यातील हुनर दाखवत शतकी खेळी केली. त्याने नाबाद १०३ धावा ठोकल्या. त्याला नितीन सैनीने ६६ धावा करत शानदार साथ दिली. बांगलादेशकडून सुभासीस राय आणि ताजुमुल इस्लामने प्रत्येकी तीन गडी बाद केले. बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात समावेश असलेल्या मुकुंदने निराश केले. त्याला केवळ १६ धावा फटकावता आल्या. वेगवान गोलंदाज शुभाशिष रॉयच्या गोलंदाजीवर तो इमरुल कायेसकडे झेल देत माघारी परतला.