पत्नी, दोन मुलींचा खून करून पतीची आत्महत्या

0

पुणे : कात्रजजवळील आंबेगाव खुर्द येथे पतीने दोन मुली व पत्नीचा झोपेत गळा आवळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी कात्रज परिसरातील दत्तनगर येथे उघडकीस आला. आत्महत्येपूर्वी या व्यक्तीने सुसाईड नोट लिहून ठेवली असून, आम्ही चौघे जात असून यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे त्यात म्हटले आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दीपक सखाराम हांडे (वय 42, रा. गल्ली क्रमांक 8, टेल्को कॉलनी, दत्तनगर कात्रज) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. पत्नी स्वाती (वय 35) आणि तेजस (वय 10) व (वय 12) अशी मरण पावलेल्या मुलींची नावे आहेत. तेजस कात्रजमधील हुजूरपागा माध्यमिक शाळेत दहावीत शिकत होती. तर वैष्णवी पोतदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये पाचवीत शिकत होती, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांनी दिली.

कुटुंब मूळचे संगमनेरचे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हांडे मूळचे संगमनेरचे आहेत. नोकरीच्या निमित्ताने काही वर्षांपासून ते पुण्यात राहत होते. संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्यात ते नोकरी करत होते. हांडे कुटुंबिय टेल्को कॉलनीत फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. त्यांच्याजवळ हांडे यांचे भाऊ व इतर नातेवाईक राहतात. रविवारी सकाळी दहा वाजले तरी कोणीही बाहेर आले नाही. त्यामुळे त्यांच्या भावाने दरवाजा ठोठावला. पण, बराच वेळ दरवाजा न उघडल्यामुळे त्यांनी खिडकीची काच फोडून आत पाहिल्यानंतर हांडे यांनी हॉलमधील पंख्याला गळफास घेतल्याचे आढळून आले. हांडे यांच्या भावाने तत्काळ भारती विद्यापीठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह गायकवाड व त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हांडे वन बीएचके फ्लॅटमध्ये राहत होते. फ्लॅटचा हॉल व किचन एकत्रच आहे. पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी हांडे यांनी हॉलमधील पंख्याला गळफास घेतल्याचे, तर हॉलमधील कॉटवर तेजसचा मृतदेह आढळून आला. बेडरुममधील कॉटवर स्वाती व वैष्णवी यांचे मडतदेह आढळून आले. तिघींचाही दोरीने गळा आवळून खून केल्याचे आढळून आले. हांडे यांनी लिहून ठेवलेली सुसाईट नोट पोलिसांना मिळाली आहे. आम्ही चौघे जात आहोत. आमच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, असे या चिठीत म्हटले आहे. तसेच, पोलिसांना एक डायरी मिळाली असून, त्यामध्ये हांडे यांनी उधारीने घेतलेल्या पैशांची नोंद आहे. त्यामुळे हांडे यांनी तिघींचा खून करत स्वतः आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खून व आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.