निष्ठेचा कचरा, सोवळ्याचे धिंडवडे

0

सेवा आणि समाजकार्यात नफ्यातोट्याचे गणित शिरले की त्याचे व्यापारात रूपांतर होते आणि व्यापार हा कधीच कुणाच्या फायद्यासाठी करायचा नसतो, ज्यांना खरोखर व्यापार करायचा आहे त्यांना सेवाकार्याची ढाल करून राजकारण नासवू नये असे एक सुंदर वाक्य लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्रात वाचले. आधीचे नेते द्रष्टे होते असे आपण म्हणतो ते उगाच नाही, आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्यात आगामी काळात काय घडणार आहे याची त्यांना उत्तम जाण असते. यशवंतराव अशा दूरदृष्टी असणार्‍या मोजक्या नेत्यांपैकी एक होते. आज सगळ्याच पक्षात निवडणुकीच्या तोंडावर जे काही सुरू आहे, ते बघितले की राजकीय पक्ष आणि राजकीय कार्यकर्ते यांच्यात नफ्यातोट्याचे गणित कसे खोलवर शिरले आणि रुजले पण आहे याचा प्रत्यय येतो. याच गणितामुळे गल्लीबोळात आपापले झेंडे मिरवत एकमेकांची टाळकी फोडणारी माणसं आपल्या निष्ठेचे कलेवर खांद्यावर घेऊन फिरतात अन् उघड्या डोळ्याने पक्षाच्या सोवळ्याचे धिंडवडे बघतात.

असंख्य पापभिरू लोक भारतीय जनता पार्टीला इतरांपेक्षा थोडे वेगळे मानतात आणि त्या वेगळेपणाची हा पक्षही वेळोवेळी जाहिरात करीत आला आहे. पार्टी विथ डिफरन्स असे म्हणवून घ्यायला आवडत नाही, असा एकही भाजप नेता किंवा कार्यकर्ता या पक्षात शोधूनही सापडत नाही, राजकारणात लोकांना आपल्या बाजूला ओढायचे असेल तर ‘मी नाही त्यातली…’, असे पालूपद लावावे लागते, भाजपने दीर्घकाळ आपल्या नावापुढे ते लावून लोकांना जवळ केले आहे, गल्ली ते दिल्ली या त्यांच्या प्रगतीमध्ये सारा देश ते बघतो आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत मात्र हा सारा बनाव गळून पडल्याचे दिसत आहे. ‘हमाम मे सब नंगे’ या सत्याचा एवढ्या लवकर हा पक्ष परिचय करून देईल असे वाटले नव्हते. भाजपचा जन्म ज्या संघाच्या वैचारिक कुशीतून झाला आहे ती कूस अशा प्रकारे हे सगळे दिवटे पुत्र उजळून टाकतील असे कदाचित संघाच्या धुरिणांनादेखील वाटले नसावे.

मुंबई आणि पुण्यासारख्या महापालिका सगळ्यात खर्चिक समजल्या जातात. इथे नगरसेवक व्हायचे असेल, तर किमान 10 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागते आणि ती करण्यासाठी मोजता येणार नाहीत एवढे समाजसेवक रांगा लावून असतात. राजकारणाची जुन्या लोकांची बुरसटलेली व्याख्या या धनदांडग्यांनी बदलून टाकली आहे. सेवा सेवा करताना त्याचा उद्योग कधी झाला हे अनेकांना कळलेच नाही, संपर्क, विकास, जनसेवा, उपक्रम या कालबाह्य झालेल्या गोष्टीत जे कार्यकर्ते घाण्याच्या बैलासारखे जुंपलेले होते, त्यांना आपण एवढी वर्षे खरोखर बैलच होतो याचा साक्षात्कार या निवडणुकात झाला आहे, ज्यांचा पक्ष, विचारधारा, संघर्ष यांच्याशी काडीचाही संबंध नाही, अशी व्यापारी वृत्तीची माणसं आपल्यापेक्षा विनिंग कँडिडेट कसे काय ठरले हे शोधण्यातच त्यांची पुढची पाच वर्षे निघून जाणार आहेत, तोवर आयत्या पिठावर रेघोट्या मारायला आलेला आगंतुक त्याचा नेता झालेला असेल आणि मग पुन्हा हा हाडाचा कार्यकर्ता आपल्या निष्ठेची लक्तरे सावरत असलेला पाहायला मिळेल.

पैसा आणि उपद्रवमूल्य यांच्यापुढे विचार, निष्ठा आणि प्रामाणिकपणा यांच्या कशा ठिकर्‍या उडवल्या जातात आणि तेसुद्धा चारित्र्याच्या गप्पा मारताना न थकणार्‍या भाजपकडून हे पाहिले की आगामी राजकारणाची दिशा कशी असेल, हा सेवेच्या नावावर सुरू झालेला प्रवाह कुठे पतित होईल याचा अदमास यायला लागतो. ज्याला तुरुंगात घाला अशी मागणी जो भाजप करतो त्या असंख्य गुंड, गुन्हेगार, बलात्कारी लोकांना एका रात्रीत हा पक्ष उमेदवारी देऊन पवित्र करून टाकतो, नवरा राष्ट्रवादीचा आमदार असताना त्याच्या पत्नीला उमेदवारी देताना भाजपला काहीही गैर केल्याची जाणीव होत नाही, उलट पक्षाचे झाडून सगळे प्रवक्तेे समर्थनाची लाळ गाळायला सुरुवात करतात हे सगळे सामान्य माणसासाठी अनाकलनीय ठरते. विरोधात असली की भ्रष्ट आणि आपल्यात येताच पवित्र असे परिवर्तन करणारे कोणते गंगाजल भाजपकडे आहे कळायला मार्ग नाही.

सत्ताकारण हे अतिशय बेडर असते, त्याच्या मार्गात येणार्‍या प्रत्येक अडथळ्यांवर अमानुष मात करीत सत्ता मार्गक्रमण करीत जाते, या वाटेत निष्ठेच्या आणि प्रामाणिपणाच्या ठिकर्‍या उडतात, संयमाचे बळी दिले जातात. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असे विचित्र समीकरण अतिशय प्रभावी बनले आहे, या नव्या राजकीय धंद्याला लोकांचा दुर्दैवाने पाठिंबा वाढत आहे हे आणखी गंभीर आहे. जो आज 10 कोटी खर्च करेल तो आगामी काळात त्याचे 50 कोटी वसूल करेल हे साधें गणित शेंबड्या पोरालासुद्धा कळेल. परंतु, निवडणुकीच्या काळात आमच्या डोळ्यावर झापडी तयार होतात. आम्हाला हित अन् अहित कशात आहे याचा विसर पडतो, जो अधिक खरंच करेल त्याचा माहोल तयार होतो आणि अशा माहोलकडे जाणार्‍यांची संख्या अधिक वाढत आहे, आश्‍चर्य याचे वाटते की जनसंघ ते भाजप या प्रवासात ज्यांनी लोकांना राजकीय शहाणपण देण्यात हयात खर्च केली ते लोकच पथभ्रष्ट झालेले आहेत, त्यांच्या सोवळ्याचे धिंडवडे आपण याकाळात पाहतोय आणि घशाला कोरड पडेपर्यंत जिंदाबाद करणार्‍या कार्यकर्त्यांचे मरणसुद्धा, याच्या वेदना होण्याइतपत संवेदना आता आपल्या राहिल्या आहेत का हो?

(लेखक दैनिक जनशक्तिचे कार्यकारी संपादक आहेत.)

– पुरुषोत्तम आवारे पाटील
9892162248