‘महाराष्ट्रातून २०२२ मध्ये ५३५ महिला-मुली बेपत्ता’; रूपाली चाकणकर यांचा गंभीर आरोप

मुंबई : महाराष्ट्रातून २०२२ मध्ये ५३५ महिला-मुली बेपत्ता झाल्याचा गंभीर आरोप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केला. तसेच या महिला-मुलींना मानवी तस्करीच्या जाण्यात अडकवण्यात आल्याची भीतीही व्यक्त केली. काही एजंट नोकरीचं आमिष देऊन या महिला-मुलींना आखाती देशात नेतात आणि तिथं त्याचे मोबाईल-कागदपत्रे दमा केली जातात, असा आरोप रूपाली चाकणकर यांनी केला आहे.

रूपाली चाकणकर म्हणाल्या की, पुण्याच्या घटनेनंतर मी पोलीस अधिक्षक आणि पोलीस आयुक्तालयात अशा घटनांची माहिती विचारली. तेव्हा अशी एखादीच घटना आहे. २०२२ मध्ये ५३५ महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यातील मुली-महिलांची मानवी तस्करी झालेली असू शकते. ती शक्यता नाकारता येणार नाही. पुण्यात एक घटना घडली. ते कुटुंब मला येऊन भेटलं आणि त्यामुळे माझ्याकडे ही आकडेवारी आली.

हे प्रकार लव्ह जिहादचे वाटत नाही. लॉकडाऊनच्या काळात घरातील वडील किंवा भाऊ अशा कर्त्या पुरूषाचं निधन झाल्यामुळे आर्थिक ताण निर्माण झाला. त्यामुळे काही महिला मुलींना व्यावसाय-नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडावं लागलं. या काळात काही एजंटच्या माध्यमातून नोकरीचं अमिष दाखवण्यात आलं. आम्ही तुम्हाला चांगली नोकरी देऊ असं सांगण्यात आलं आणि त्यावेळी नोकरीची गरज असल्याने या महिला मुलींनी एजंटकडे नावनोंदणी केली. एजंट त्यांना जेव्हा आखाती देशात घेऊन गेले तेव्हा विमानतळावरच त्यांची कागदपत्रे, मोबईल जमा करून घेतले. या सर्व महिला मुली मानवी तस्करीच्या जाळ्यात आडकल्या, असा आरोप रूपाली चाकणकरांनी केला.