52 ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार

0

मुक्ताईनगर। तालुक्यात विज वितरणची 9 कोटी 39 लाखांची थकबाकी असून तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीकडे बाकी भरणा न केल्यास वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हा मुख्य अभियंता जनविर यांनी दिले. बुधवार 26 रोजी सायंकाळी 6 वाजता मुक्ताईनगर ग्रामपंचायत येथे सरपंच ललित महाजन व सहाय्यक अभियंता मनोज चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली.

9 कोटी 39 लाख रुपयांची थकबाकी
यावेळी चौधरी यांनी मुक्ताईनगर ग्रामपंचायतीला थकबाकीच्या 20 टक्के रक्कम म्हणजे 25 लाख भरण्याचे सांगितले. वीज वितरण कंपनीची तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठ्याच्या योजनांचे एकूण थकित वीज बिलापोटी 9 कोटी 39 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी मुक्ताईनगर ग्रामपंचायतीकडे 1 कोटी 15 लाख एवढी थकबाकी आहे. याबाबत 21 रोजी सदर रक्कम भरण्याची नोटीस देण्यात आली असुन आठ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे, त्यानुसार एकूण रकमेच्या 20 टक्के रक्कम भरावयाची आहे.

25 लाख रुपये भरणे अनिवार्य
मुक्ताईनगर ग्रामपंचायतीला 25 लाख रुपये भरणे अनिवार्य आहे, अन्यथा भर उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा खंडित होईल. त्यामुळे नागरीकांना गंभीर पाणीटंचाईला सामोरे जाण्याची चिन्हे आहेत. याकरीता आतापर्यंत 3 कोटी 87 लाख रुपये शहरातील रहीवाशांवर निव्वळ थकबाकी असुन पैकी फक्त 25 टक्के रक्कम वसुलीच झाली आहे. त्यामुळे जर नागरीकांनी सहकार्य करीत कर भरणा केल्यास पाणीपुरवठ्याच्या 11 वीज जोडण्या खंडीत होण्यापासून वाचु शकतात.

सक्तीची वसुली करणार
वीज वितरणतर्फे दिलेल्या आठ दिवसांच्या मुदतीत मुक्ताईनगर ग्रामपांचयती एकूण थकबाकीच्या 20 टक्के म्हणजेच 25 लाख रक्कम भरणे अनिवार्य आहे. सरपंच ललित महाजन व सहाय्यक उपअभियंता मनोज चौधरी यांनी पत्रकार परीषद घेवून सदर माहीती दिली. भर उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याची वीज कपात होऊ नये म्हणून शहरात सक्तीची वसुली करण्यात येईल. नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच ललित महाजन यांनी केले आहे. यावेळी पत्रकार परीषदेत जिल्हापरिषद सदस्य जयपाल बोदडे उपस्थित होते.