Private Advt

50 लाखांची लाच भोवली : जलसंधारण विभागातील तीन बडे अधिकारी नागपूर एसीबीच्या जाळ्यात

Nagpur ACB Trap नागपूर : जलसंधारण विभागातील तीन बड्या अधिकार्‍यांना 50 लाखांच्या लाच मागणीप्रकरणी नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या लाचखोर अधिकार्‍यांना अटक
प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे (46) यांना मंगळवारी रात्री ब्रम्हपुरी येथे 50 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आल्यानंतर नागपूर येथून प्रभारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कवीजीत पाटील (32) व चंद्रपूर येथील लेखाधिकारी जलसंधारण कार्यालयातील रोहित गौतम (35) यांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
नागपूरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) अनामिका मिर्झापुरे, निरीक्षक सचिन माटे, निरीक्षक सारंग मिराशी, निरीक्षक प्रवीण लकडे, निरीक्षक जितेंद्र गुरुनुले, कॉन्स्टेबल संतोष पांढरे, विकास सायरे, सारंग बालपांडे, सुशील यादव, बबिता कोकरे, गोविंद कोठडी आणि गिरीश कोंबडे आदींच्या पथकाने कारवाई केली.

लाच स्वीकारताना आरोपी जाळ्यात
नागपूरच्या 46 वर्षीय सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरने कोल्हापुरी बंधार्‍याचे सर्वेक्षण केले व त्याच्या देयकांची बिले सादर केली होती. बिलाची व उर्वरित रक्कम बिलाची रक्कम वितरीत करण्याकरता तिन्ही अधिकार्‍यांनी 81 लाख रुपयांच्या लाच मागितली. तडजोडीअंती 50 लाख देण्याचे ठरले. तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्याने त्याने नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवताच मंगळवारी सापळा रचून शेंडे याला तक्रारदाराकडून 50 लाख रुपयांची लाच मागताना रंगेहाथ पकडण्यात आले. पाटील आणि गौतम यांच्यावतीने शेंडे याने लाचेची रक्कम स्वीकारल्याने त्यांनाही अटक करण्यात आली.