जिल्ह्यात विविध ठिकाणी हातभट्ट्या उद्ध्वस्त

0

जळगाव । जिल्ह्यातील एरंडोल व चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी गावठी दारू तयार करणार्‍या अड्ड्यांवर धाड टाकून दारू तयार करण्याचे रसायान व साहित्य उध्वस्त केले. यात एरंडोल येथील कारवाईत आरोपी पोलीसांच्या तावडीतून सुटून फरार झाले आहेत. तर चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी वाघळी येथे कारवाईकरत दोघांना अटक करण्यात यश मिळविले आहे. एरंडोल येथून 450 लिटर दारू तर वाघळी येथून 1200 लिटर कच्चे रसायन जप्त करण्यात आले आहे.

एरंडोल तालुक्यातील कढोली येथील अवैध दारू बनविणार्‍या अड्यांवर एरंडोल पोलिसांनी शनिवार 28 रोजी धडक कारवाई करून तीन दारू हातभट्ट्या उधवस्त केल्या. या कारवाईत दारू बनविण्याचे रसायन व साहित्य नष्ट करून 32 हजार रु. किमतीची 450 लिटर दारू जप्त केली. या कारवाईअंतर्गत आरोपी मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात यशस्वी झाले.याबाबत एरंडोल पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शनिवार 28 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील कढोली येथील गिरणा नदी काठावर असलेल्या किशोर भास्कर कोळी यांच्या हातभट्टी वर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीअतंर्गत 12 हजार रु. किमतीची 200 ली. दारू जप्त करण्यात आली.

दोघांवर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
चाळीसगाव । तालुक्यातील वाघळी शिवारातील तितूर नदी किनार्‍यावर गावठी दारु तयार करणार्‍या भट्टीवर चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी शविवारी 28 रोजी पहाटे 6:10 वाजेच्या सुमारास छापा टाकला. यात 1200 लिटर कच्चे रसायन, तयार गावठी दारू व इतर साहित्यासह दोघांना ताब्यात घेतले असून दारू तयार करण्याच्या साहित्यासह दारूचे रसायन जागेवर उध्वस्त करण्यात आले.दोघांवर ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तितुर नदी किनारी गावठी दारू साठा
चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांना वाघळी शिवारातील तितुर नदी किनारी मोठ्या प्रमाणावर गावठी दारू तयार करण्याची भट्टी असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो.उ.नि. रमेश मानकर, सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील, हवालदार किशोर पाटील, मनोहर जाधव, विलास पाटील, पो.कॉ. विनोद भोई, ज्ञानेश्वर बडगुजर, नितेश पाटील यांचे पथक तयार केले. त्यांना कारवाईचे आदेश दिल्यानंतर या पथकाने शनिवारी पहाटे 6:10 वाजता गावठी दारू भट्टीवर छापा मारून चौदा हजार किमतीचे गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, 20 लिटर तयार रसायन, 210 लिटर गावठी दारू त्याच बरोबर गावठी दारू तयार करण्याची साधने, बॅरल, कॅन, यासह दारू तयार करणारे राजेंद्र रतन वाघ (42) संजय मुरलीधर शिंदे (44) दोघांना यांना ताब्यात घेण्यात आले. गावठी दारू तयार करण्याचे रसायन व दारू जागेवर नाश करून बॅरल, कॅन यांची तोडफोड करून ते जागेवर उध्वस्त करण्यात आले. दोघां आरोपींवर पोलीस नाईक शशिकांत महाजन यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पोलीस प्रोव्हीजन कलम 65 ह, ब, क, इ (83) प्रमाणे कारवाई करून त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे समजपत्र देत सोडण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास पो.उ.नि. रमेश मानकर करीत आहेत.