दहशतवादाविरुद्ध खांद्याला खांदा देऊन लढू! डोनाल्ड ट्रम्प यांचे मोदींना आश्‍वासन

0

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : भारत हा अमेरिकेचा सच्चा मित्र असून, चांगला सहकारी आहे, असे सांगून अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मंगळवारी रात्री दूरध्वनीवरून दीर्घ चर्चा केली. तसेच, मोदी यांना अमेरिका भेटीचे निमंत्रणही दिले. दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईत आपण एकमेकांच्या खाद्याला खांदा देऊन लढू असे सांगतानाच, दोन्ही नेत्यांनी दक्षिण आणि मध्य आशियातील संरक्षणविषयक मुद्द्यांवर चर्चाही केली. संरक्षण क्षेत्र व लष्करी सहकार्याचे दोन देशातील पर्व पुढील काळातही सुरुच राहील, असे आश्‍वासनही ट्रम्प यांनी मोदींना दिले. मोदींशी बोलताना ट्रम्प यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही व्हाईट हाऊसच्या भेटीवर घेऊन या, अशी विनंती केली. तर मोदी यांनी ट्रम्प यांच्या विजयाबद्दल राष्ट्रपती मुखर्जी यांनी शुभेच्छा दिल्या असल्याचे व अभिनंदन केले असल्याचे त्यांना सांगितले.

भारत हा अमेरिकेचा खरा मित्र : ट्रम्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दूरध्वनीवरील चर्चेचा तपशील नंतर व्हाईट हाऊसच्यावतीने प्रसारमाध्यमांना देण्यात आला. या माहितीनुसार, ट्रम्प यांनी भारत हा अमेरिकेचा खरा मित्र असल्याचे त्यांनी नमूद केले. जगभरातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतासारख्या मित्राच्या मदतीची अमेरिकेला गरज असून, या वर्षाच्या अखेरपर्यंत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे मोदी यांचे अमेरिकेत शाही स्वागत करण्यासाठी इच्छुक आहेत. दोन्हीही नेत्यांनी अर्थव्यवस्था, संरक्षण आणि लष्करी सहाय्य यासारख्या भारत-अमेरिकेच्या सहकार्यावर या चर्चेत भर दिला. या क्षेत्रात एकमेकांचे सहकार्य आणखी मजबूत करण्यावर दोन्ही राष्ट्रप्रमुखांचे मतौक्य झाले. दक्षिण आशिया व मध्य आशियातील सुरक्षेच्या मुद्द्यावरही यावेळी चर्चा झाली. ट्रम्प आणि मोदी यांनी संकल्प केला की, दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईत अमेरिका व भारत हे खांद्याला खांदा देऊन लढतील, अशी माहितीही व्हाईट हाऊसच्यावतीने देण्यात आली.

संबंध वृद्धिंगत करणार!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून 20 जानेवारीरोजी शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेच्या मित्र राष्ट्रप्रमुखांशी स्वतःहून दूरध्वनी करून चर्चा केली होती. त्यापैकी मोदी हे पाचवे राष्ट्रप्रमुख आहेत. यापूर्वी ट्रम्प यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडेयू, मेक्सिकोचे अध्यक्ष पेना निएतो, इस्त्राईलचे पंतप्रधान बेन्जिमिन नेत्यान्यू आणि इजिप्तचे पंतप्रधान अब्देल फत्ताह एल-सिसि व ब्रिटनच्या पंतप्रधान तेरेसा मे यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेबद्दल बोलताना मोदी यांनी सांगितले, की भारत-अमेरिकेच्या द्वीपक्षीय संबंधात वाढ करण्यासह एकमेकांसोबत एकजुटीने काम करण्यावर आम्ही सहमत झालो आहोत.

भारतभेटीचे निमंत्रण
ट्रम्प यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले असल्याचेही मोदी यांनी सांगितले. दोन्ही नेत्यांतील चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असल्याचेही पंतप्रधान कार्यालयाने प्रसारमाध्यमांना सांगितले. 8 नोव्हेंबररोजी ट्रम्प यांनी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्त केला होता. त्यानंतर मोदी यांनी दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले होते. या निवडणुकीत ट्रम्प यांनी ज्या देशांसोबत अमेरिकेचे संबंध आणखी मजबूत करण्याचे आश्‍वासन जनतेला दिले होते, त्यात इस्त्राईलसह भारताचाही समावेश होता.