देशमुखांची ऑथोरिटी

0

लोकशाहीत प्रत्येकाला स्वातंत्र्य असते. त्यामुळे कोणी काय बोलावे आणि काय बोलू नये हे ठरवण्याचा अधिकार त्या व्यक्तीशिवाय इतर कोणाला असू नये. मात्र, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. खूपच धूसर फरक आहे स्वातंत्र्य आणि स्वैराचारात. मात्र, बोलू लागले की लोकं नेमके हेच विसरतात. नको तेही बोलून जातात. जिभ घसरते आणि मग स्वातंत्र्य स्वैराचारात बदलते. कानालाच नाही तर मग अगदी मनालाही ते बोलणे खटकू लागते.

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याबाबतीत नेमके असेच घडताना दिसत आहे. सुभाषबापू देशमुख सोलापूरचे. कौतुक वाटावी अशीच प्रगती. त्यांनी व्यावसायिक आणि राजकीय जीवनातील शिखर गाठले. त्यांच्या लोकमंगल उद्योगाचा विस्तार कौतुक वाटावा असाच. पण त्याचवेळी सत्तेचा लाल दिवा लाभल्यापासून बदललेली त्यांची भाषा चिंताजनक.
त्यांनी सुरुवात गेल्या ऑगस्टमध्ये केली. पंढरपुरातील कार्यकर्ता मेळाव्यात सुभाष देशमुखांनी आपले राजकीय स्पर्धक शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांना थेट बघून घेण्याची भाषा वापरली. धमकीची भाषा मंत्रीमहोदयांनी जाहीर सभेत वापरली होती.

त्यावेळी स्वाभाविकच वाद झाला. त्यानंतर मंत्रीमहोदयांनी मी तसे म्हटलेच नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला, अशी कोलांटी उडी मारली. त्यांची ती कोलांटी लक्षात असल्यानेच गेले दोन दिवस खुलाशाची वाट पाहत होतो. पण खुलासा काही आला नाही. त्यामुळेच अखेर आज लिहीत आहे. खुलासा नाही याचा अर्थ सुभाष देशमुख जे बोलले त्याच्याशी सध्या तरी ते ठाम आहेत.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे ताजे वक्तव्य बारामती येथील. खरेतर एखाद्या मोठ्या नेत्यांविरोधात त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन बोलणे हे तसे हिमतीचे काम. देशमुख यांनी ते केले याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे. मात्र, ते जे बोलले त्यातील काही भाग मात्र न शोभणारा! बारामतीत कारखेलला भाजपचा कार्यकर्ता मेळावा होता. तेथे सुभाष देशमुख प्रमुख पाहुणे होते. तेथे ते म्हणाले, केवळ चार खासदार असलेल्या शरद पवार यांच्या निवृत्तीची वेळ आली आहे.

खरेतर सहकारमंत्री म्हणून सुभाष देशमुखांकडे भरपूर माहिती येत असते. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आरोप करावे. कारवाई करावी. कोणीच काही बोलणार नाही. त्यांनी आघाडी सरकारच्या काळातील पाटबंधारे खात्याच्या कारभाराचा पंचनामा केला. ते म्हणाले, सत्तर हजार कोटी रुपये खर्चूनही बारामती तालुक्यातील जिरायती भागासाठी पाणी नाही हे जिरायती भागातील जनतेसाठी दुर्भाग्याचे आहे. तेथेच ते थांबले असते तर चालले असते. मेळाव्यात जमलेल्यांप्रमाणे बाहेरही टाळ्या वाजल्याच असत्या, पण कुणीही त्यांना विरोध करू शकले नसते. पण सुभाषबापूंना अनेक संस्थांचे स्वामी असूनही हा हिशेब कळला नसावा.

पाटंबधारे खात्याची लक्तरे बारामतीच्या वेशीवर टांगल्यानंतर बहुधा त्यांना आपलाच सुसंस्कृतपणाचा मुखवटा फेकून द्यावासा वाटला असणार. त्यामुळेच ते पुढे घसरले, ते म्हणाले, 2004 साली शरद पवार हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. मात्र, ते शक्य झाले नाही. आता तर तशी परिस्थितीही राहिलेली नाही. स्वत:च्या पक्षाचे फक्त चार खासदार असलेल्या शरद पवार यांच्या निवृत्तीची वेळ आली आहे.
देशमुखसाहेबांचा हाच सल्ला तसा खटकणारा आहे. कारण एखाद्याला सल्ला द्यायचा तर त्या माणसापेक्षाही आपले कर्तृत्व मोठे असले पाहिजे. वय, अनुभव, ज्ञान हेही जास्तच असले पाहिजे, तरच ते शोभते, नाहीतर मग शरद पवारसाहेबांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात येऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बोलले तसे खुपते. मग लोकं अशांची ऑथोरिटी काय, असे प्रश्‍न विचारू लागतात.

शरद पवार यांना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेही तेल लावलेला पैलवान, एवढेच नव्हे तर मैद्याचे पोतेही म्हणत. पण ते त्यांच्या तोंडून ऐकताना खटकायचे नाही. त्यांचा अनुभव, कर्तृत्व, नेतृत्व तेवढे मोठे होते. तसेच शरद पवार यांच्याशी असलेले नातेही. व्यासपीठावरून जाहीररीत्या पवारांच्या चिंध्या करणारे बाळासाहेब तेवढ्याच जाहीरपणे त्यांना शरदबाबू म्हणून गोंजारतही असत. पण त्याच पवारांसाठी, तेच तेल लावलेला पैलवान हे शब्द राज ठाकरे यांनी वापरणे अस्थानी आणि कानाला खटकणारे वाटते. पुन्हा राज ठाकरे म्हणाले होते ते पवारसाहेबांनी कॅन्सरवरही मात केली त्याबद्दल. आणि पुन्हा अमृतमहोत्सवी सोहळ्यात. त्यामुळेच अधिकच!

शरद पवार असोत वा सुशीलकुमार शिंदे, यांचे कर्तृत्व हे सुभाष देशमुख यांच्या कर्तृत्वापेक्षा नक्कीच उजवे आहे. टीका बारामतीच्या जिरायती भागाच्या मागासलेपणाएवढीच असती तर खटकले नसते. पण आपला अभ्यास, परिश्रम याच्याबळावर हिमालयाएवढी प्रगती केली त्या पवारसाहेबांना सोलापूर सीमेवरच्या महादेवाच्या डोंगराएवढीच राजकीय उंची गाठून आता कुठे पुढे झेपावत असलेल्या सुभाष देशमुखसाहेबांनी निवृत्तीचा सल्ला देणे जरा जास्तच!

लालबत्ती मिळाल्यापासून घसरलेली भाषा त्यांनी सावरावी. बोलण्यापेक्षा करण्यावर भर द्यावा, तरच महादेवाच्या डोंगराएवढीच काय सह्याद्रीच्या कळसूबाईच्या पुढेही त्यांचे कर्तृत्व झेपावेल. नाहीतरी ते ज्यांच्या नावावर निवडून येतात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुंना त्यांच्यापेक्षा नक्कीच जास्त कळते, हे कळण्याइतके ते नक्कीच सुज्ञ आहेत!