हिराखंड एक्स्प्रेसचे डबे घसरले

0

भुवनेश्‍वर । जजपा जगदलपूर-भुवनेश्‍वर (हिराखंड) एक्स्प्रेस शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास लोहमार्गावरून घसरल्याने झालेल्या भीषण अपघातात 39 प्रवासी ठार झाले असून, 60 पेक्षाअधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही गाडी जगदलपूरहून भुवनेश्‍वरला जात होती. गाडीचे तब्बल नऊ डबे लोहमार्गावरून घसरले असून, रेल्वे अधिकार्‍यांनी घातपाताची शक्यता वर्तविली आहे. केंद्र सरकारने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, मृतकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख तर जखमींना 50 हजारांची तातडीची मदत देण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. मृतकांची संख्या वाढण्याची भीतीही रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केली.

घातपाताची शक्यता
भरधाव असलेल्या या गाडीचे डबे कुनेरू स्थानकानजिक लोहमार्गावरून घसरले. त्यात रेल्वेचे इंजिन, दोन वातानुकुलित कोच, चार शयनयान कोच आणि दोन सामान्य श्रेणीच्या डब्यांचा समावेश होता. कुनेरू स्थानक हे नक्षल प्रभावित असून, नक्षलवाद्यांनी लोहमार्गाशी छेडछाड केल्याने हा अपघात झाला असावा, अशा प्राथमिक अंदाज रेल्वेच्या अधिकार्‍यांनी वर्तविला आहे. ओदिशा पोलिसांनी मात्र या अपघातामागे घातपात अथवा नक्षलवाद्यांचा हात असल्याची शक्यता फेटाळली आहे.

चौकशीसाठी सुरक्षा आयुक्तांची समिती
रेल्वेचे प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी सांगितले, की दुर्घटनेच्या कारणाचा तपास करण्यासाठी सुरक्षा आयुक्तांची समिती गठीत करण्यात आली आहे. त्यांच्या तपासानंतरच खरे कारण पुढे येईल. तथापि, ही घटना घातपात असल्याचा संशय असून, घटनेच्या काही तासांपूर्वीच एक मालगाडी या लोहमार्गावरून सुखरूप गेली होती. गस्त पथकानेही या मार्गाचे परीक्षण केले होते. अपघातग्रस्त चालकाला अचानक जोरदार झटका बसला, जोरदार आवाजामुळे त्याने आपत्कालिन ब्रेक लावले. त्यातच इंजिनसह नऊ डबे लोहमार्गावरून घसरले. प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस अगोदरच ही घटना घडल्याने रेल्वेला या अपघातामागे नक्षलवाद्यांकडून घातपाताचा संशय असल्याचेही सक्सेना यांनी सांगितले. घटनेनंतर पहिल्यांदा 34 मृतदेह बाहेर काढण्यात आले, त्यानंतर आणखी पाच मृतदेह हाती आलेत. पैकी 18 जणांची ओळख पटली होती. आणखी जखमी व मृतदेह काढण्याचे काम दिवसभर सुरु होते. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटविण्याचे कामही सुरु होते.

रेल्वेची सुरक्षा ऐरणीवर : देशभरातील रेल्वे अपघातांमध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आधी बहुतेक अपघात हे मानवी चुकीमुळे होत असल्याचे निष्पन्न व्हायचे. मात्र अलीकडच्या काही अपघातांमध्ये घातपाताची शक्यता समोर आली आहे. गेल्या महिन्यातच कानपूर येथे झालेल्या अपघातात पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तहेर यंत्रणेचा हात असल्याची बाब दोन दिवस आधीच सिध्द झाली आहे. या संदर्भात संशयितांनी दिलेल्या माहितीवरून चौकशी सुरू असतांना रविवारी अपघात झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अर्थात यातून रेल्वेच्या सुरक्षेचा मुद्दादेखील ऐरणीवर आला आहे. दरम्यान या अपघातात 39 प्रवासी ठार झाल्याचे स्पष्ट झाले असून, अडकून पडलेल्या अनेक प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम दिवसभर युद्धपातळीवर सुरु होते. तर गंभीर जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयांत दाखल करण्यात असुन गंभीर अपघातातील जखमी झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी आपल्या आप्तांसाठी रुग्णालयात एकच गर्दी केली होती.

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
घटनेनंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. विजियानगर व रायगढा जिल्हा प्रशासनाने मदत व बचाव कार्य सुरु केले होते. या रेल्वेला एकूण 22 डबे होते. अपघातानंतर रायगढा व विजियानगर लोहमार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. त्यामुळे तीन गाड्या रद्द करण्यात आल्या तर आठ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते. रेल्वेतील इतर प्रवाशांना पुढे जाण्यासाठी परिवहन मंडळ व खासगी बसेसची सोय रेल्वे प्रशासनाने केली होती. तर जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी 10 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या.