किशोरवयात विद्यार्थीनींनी आरोग्याची काळजी घ्यावी

0

भुसावळ । आधुनिक जीवनशैली रोगांना आमंत्रण देणारी ठरत आहे. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आहार, व्यायाम आणि विचार महत्वाचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक विचार. किशोरवयात मुलींना आढळणारा रक्तक्षय काळजीची बाब आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना आरोग्याची काळजी घ्यावी अशा सूचना महिला रोगतज्ञ डॉ. दिपाली गोठवाल यांनी केल्या. येथील श्री गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वूमन्स डेवलपमेंट सेलतर्फे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. याप्रसंगी त्या बोलत होेत्या.

शारिरीक आरोग्यासह मानसिक आरोग्यही जपावे
पुढे बोलतांना डॉ. गोठवाल म्हणाल्या की, महाविद्यालयीन जीवनातील प्रत्येक टप्प्याचा विचार करताना जसा शारीरिक आरोग्याचा विचार करतो तसेच मुलींचे मानसिक आरोग्यही जपायला हवे. विशेषत: मुलीला वाढवताना केला जाणारा भेदभाव वा लहान-मोठ्या वयाप्रमाणे त्या मुलीकडे दिले गेलेले लक्ष, अभ्यासातील कमी-अधिक हुशारीमुळे होणारी तुलना, वागण्या-दिसण्यातील तफावत याचा नकळत तौलनिक विचार मुलींकडून वाढत्या वयाप्रमाणे होतो असे अनुभवयास आलेले आहे.

व्यक्तिमत्वातही होतात बदल
वयात आल्यानंतर पौगंडावस्थतेतील शारीरिक बदलाबरोबरच मानसिक बदल तिच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणतात. या मानसिक बदलांकडे फार गौणपणे पाहिले जाते. दैनदिन जीवन सुरळीतपणे चालू असले तरी मुलींना एकाकीपणाची भावना होते.

यांची होती उपस्थिती
त्यामुळे अशावेळी मुलींनी कुठलाही संकोच न बाळगता एखादा छंद जोपासणे, आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणी यांचा आधार घेणे गरजेचे आहे कारण मानसिक पाठबळ गरजेचे असते असे विचार त्यांनी मांडले. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाच्या प्राध्यापिका सुलभा शिंदे, प्राचार्य डॉ. आर.पी. सिंह यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी वूमन्स डेवलपमेंट सेलच्या प्रा. प्रीती सुब्रमण्यम, प्रा. नीता नेमाडे, प्रा. स्मिता चौधरी, प्रा. धिरज पाटील यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.