विदर्भाची मोना मेश्राम भारतीय महिला क्रिकेट संघात

0

नवी दिल्ली : विदर्भ संघाची कर्णधार मोना मेश्राम हिला पुढील महिन्यात कोलंबोत होणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता सामन्यांसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. ती जखमी स्मृती मानधना हिचे स्थान घेईल. स्मृती आॅस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळताना जखमी झाली. यामुळे मिताली राजच्या नेतृत्वाखालील १४ सदस्यांच्या भारतीय संघात मोनाला स्थान देण्यात येत असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले. भारताला ७ फेब्रुवारी रोजी लंकेविरुद्ध पहिला पात्रता सामना खेळायचा आहे. त्याआधी द. आफ्रिकेविरुद्ध एक सराव सामना होणार आहे.

बीसीसीआयने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार ७ फेब्रुवारीपासून कोलंबोत खेळल्या जाणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत स्मृती खेळू शकणार नाही. मोनाला १४ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. पात्रता फेरीत भारताला अ गटात यजमान श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि थायलंड सोबत स्थान देण्यात आले आहे. ब गटात द. आफ्रिका, पाकिस्तान, बांगला देश, स्कॉटलंड आणि पापुआ न्यूगिनी यांचा समावेश असेल. विश्वचषकाचे आयोजन ब्रिटनमध्ये २६ जून ते २३ जुलै या कालावधीत होईल.