यूपीतल्या बहुरंगी लढती !

0

उत्तर प्रदेशातील सर्वाधिक प्रभावी पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्‍या समाजवादी पार्टीमध्ये शेवटी फूट पडली आहे. पक्षाचे संस्थापक मुलायमसिंग यादव आणि त्यांचे सुपुत्र अखिलेशसिंग यांच्यातील संघर्षात अखिलेश यांची सरशी झाली आहे. पक्षाचे सायकल हे चिन्ह अखिलेश यांना मिळाले असून मुलायमसिंग यादव हे पक्षाचे संस्थापक असूनही पक्षात उपरे ठरले आहेत. अखिलेशसिंग यांच्या या विजयामुळे उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीतील अनेक अनुत्तरित प्रश्‍नांची उत्तरे मिळायला लागली आहेत. त्यातला पहिला प्रश्‍न म्हणजे उत्तर प्रदेशातील विधानसभेची लढत ही नेमकी किती रंगी होणार? काँग्रेसची रणनीती आखणार्‍या प्रशांत किशोर यांनी बिहारप्रमाणेच भारतीय जनता पार्टीविरोधात सर्वांना एकत्र करून महाआघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न चालवला आहे. अशारीतीने भाजपा विरुद्ध सर्वजण अशी लढत झाली, तर भाजपाचा पराभव करणे बिहारप्रमाणेच सोपे जाईल असा त्यांचा व्होरा आहे. मात्र, त्यांच्या या चालीला समाजवादी पार्टीतल्या फुटीने शह मिळाला आहे.

समाजवादी पार्टीत फूट पडण्यामागे जी कारणे होती त्यामध्ये काँग्रेसशी युती करावी की नाही हेही एक कारण होतेच. आपल्या पक्षाने काँग्रेसच काय, पण कोणाशीही युती न करता स्वतंत्रपणे लढावे, असा मुलायमसिंग यांचा आग्रह होता. तर अखिलेश यादव महागठबंधनासाठी आग्रही होते. आता पक्षातल्या फुटीवर शिक्कामोर्तब झाल्यामुळे अखिलेश यादव हे काँग्रेसशी हातमिळवणी करण्यास स्वतंत्र झाले आहेत. त्याशिवाय अजितसिंग यांचा राष्ट्रीय लोकदल हाही पक्ष त्यांच्या महागठबंधनात सामील होणार आहे. आपली स्वतःची विलक्षण लोकप्रियता आणि या दोन छोट्या पक्षांशी झालेली युती यांचा छान मेळ जमून आपल्याला बहुमत मिळेल, असा अखिलेशसिंग यादव यांचा अंदाज आहे. ते वडिलांपासून फुटून बाजूला झाले. त्यामागे त्यांचे काका रामप्रसाद यांचीही फूस आहे. मात्र, आता अखिलेशसिंग यादव यांच्या युतीला रामप्रसाद यांचाही विरोध आहे. म्हणजे पक्ष फुटला तरी त्या फुटीमध्ये आणखी एक फूट अपेक्षित आहे. देशातल्या काही लोकांना उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधन होत आहे याचा आनंद वाटत आहे आणि हे महागठबंधन बिहारप्रमाणेच भाजपासाठी घातक ठरेल. त्यामुळे उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्यामध्ये पाय रोवण्याचे भाजपाचे स्वप्न भंग पावेल, अशी आशा या भाजपा विरोधकांना लागली आहे. परंतु, ही आशा कितपत पूर्ण होईल याविषयी शंका आहेत.

उत्तर प्रदेशामध्ये बिहारसारख्याच महागठबंधनाचा प्रयोग होऊ शकतो याचा आगावू अंदाज करून भारतीय जनता पार्टीनेसुद्धा काही डावपेच आखलेले आहेत. त्यानुसार भाजपाला उत्तर प्रदेशात विजय मिळवण्यासाठी मुस्लीम मतांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे. एकदा मुस्लीम समाज दोन-तीन पक्षांमध्ये विघटित झाला की हिंदुत्ववादी मतांच्या जोरावर भाजपाला विजय मिळवता येतो. भाजपाच्या या चालीला उत्तर प्रदेशात यश मिळालेले आहे. समाजवादी पक्षात फूट पडताच मुलायमसिंग यादव यांनी पहिले विधान केले ते मुस्लिमांसाठीच केले. अखिलेशने मुख्यमंत्रीपदाच्या काळात मुस्लिमांसाठी काहीच केले नाही, असा आरोप नेताजींनी केला. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला मुस्लीम समाजाचा पाठिंबा मिळू नये यासाठी त्यांनी हे विधान केले. त्यामुळे मुस्लीम समाजात अखिलेश यांच्यामागे जावे की नेताजींच्या मागे जावे, असा संभ्रम निर्माण होणार आहे. समाजवादी पार्टीत फूट पडली असली, तरी ही फूट महाभारताच्या लढ्यातील यादवांच्या सैन्यात पडलेल्या फुटीसारखी आहे. तेव्हा यादव सैन्य कौरवांच्या बाजूने होते. परंतु, खुद्द यदुराज श्रीकृष्ण मात्र पांडवांच्या बाजूला होता.

आता सेना महागठबंधनात जात आहे. परंतु, स्वतः मुलायमसिंग यादव मात्र महागठबंधनाच्या विरोधात आहेत. आज अखिलेश यादव यांनी आपल्या या वृद्ध पित्याचा संघटनात्मक पातळीवर पराभव केला असला, तरी मुलायमसिंग यादव यांना मानणारा यादव समाज आणि मुस्लीम समाज त्यांच्या मागेच उभा राहण्याची शक्यता आहे. अखिलेश यादव यांनी कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचे दाखवले, पण मतांचे काय? त्यांना अजिबात मते मिळणारच नाहीत असे नाही. मात्र, मुस्लीम आणि यादव मतदार निश्‍चितपणे संभ्रमात राहणार आहेत. काही मुस्लीम मते तर मायावती यांच्या मागे आहेत तर मुस्लीम मतात संभ्रम निर्माण करण्यास ओवेसीसारखे नेते तयारच आहेत. समाजवादी पक्षातली फूट ही भाजपाच्या पथ्यावर पडलेली आहे. लोकांचा आरोप असा आहे की ही फूट भाजपानेच पाडलेली आहे आणि ते खरे असेल तर त्यात काही चूक नदुसरी गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशातले हे महागठबंधन बिहारएवढे सामर्थ्यशाली नाही. लालूप्रसाद आणि नितीशकुमार या दोन मोठ्या शक्ती एकत्र आल्या होत्या. उत्तर प्रदेशात मात्र फुटलेली समाजवादी पार्टी, गलितगात्र काँग्रेस पक्ष आणि अतिशय मर्यादित असलेला राष्ट्रीय लोकदल हे महागठबंधन करत आहेत. त्यांचे हे गठबंधन भाजपाचा पराभव करण्यास समर्थ नाही.