शहरात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहर पोलीसांमार्फेत जनजागृती रॅली

0

जळगाव । रस्ता सुरक्षा अभियान 2017 अंतर्गत शहर वाहतुक शाखा व वीर सावरकर रिक्षा युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी 19 जानेवारी रोजी वाहतुक विषयक जनजागृतीपर रिक्षा रॅलीचे आयेजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवुन रॅलीची सुरूवात केली. याप्रसंगी एल.एच. पाटील स्कुलचे जितेंद्र पाटील, रॉयल फर्नींचरचे आनंद गांधी यांच्या हस्ते रिक्षांवर जनजागृतीपर पोस्टर्स लावण्यात आले. रिक्षांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. रॅलीस शहर वाहतुक शाखा कार्यालय येथून सुरूवात झाली.

रिक्षांवर जनजागृतीपर पोस्टर
ही रॅली कोर्ट चौक, रेल्वे स्टेशन, जिल्हापरिषद चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, लाना चौक मार्गे नवीन बस स्टँड मार्गांने निघाली. या रॅलीत शहरातील 200 रिक्षा चालकांनी सहभाग घेतला होता. यशस्वीतेसाठी शहर वाहतुक शाखेचे सपोनि प्रदीप देशमुख, वीर सावरकर रिक्षा युनीयनचे अध्यक्ष दिलीप सपकाळे, वीर सावरकर युनीयनचे पदाधिकारी व शहर वाहतुक शाखेच्या कर्मचार्‍यांनी कामकाज पाहिले.

मुक्ती फाऊंडेशनचे सहकार्य
शहर वाहतुक शाखा आणि मुक्ती फॉऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील शालेय विद्यार्थ्यांकरीता सुरक्षित वाहतुक विषयक निबंधलेखन व चित्रकला स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जवळपास 340 विद्यार्थी व विद्यार्थिंनींनी सहभाग नोंदविला होता. याप्रसंगी शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, मुक्ती फाऊंडेशनचे मुकुंद गोसावी, मनोज पाटील आदी उपस्थित होते.

अपघातग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन
रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शहर वाहतुक शाखेद्वारा वाहनधारकांसाठी वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. अतिवेगाने, बेदरकारपणे, स्टंट करणारे वाहनचालविणार्‍या युवकांवर कारवाईची मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यांतील वाहन चालक व नागरिकांनी त्यांच्या समोर अपघात घडल्यास अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करून प्राथमिक उपचार उपलब्ध करून देण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.