डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखा अन्यथा आंदोलन

0

आयएमएच्या पदाधिकार्‍यांनी दिले निवेदन

धुळे: राज्यासह देशभरात डॉक्टरांवर हल्ले होत असून खोट्या गुन्ह्यात डॉक्टरांना अटक करून पोलीस कारवाई होत असल्याने डॉक्टरांमध्ये असुरक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉक्टरांना सुरक्षित वाटावे यासाठी शासनाने उपाययोजना करावी अशी मागणी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या (आयएमएच्या) पदाधिकार्‍यांनी केली आहे.

यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांना एक निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशात एका डॉक्टराचा त्याच्याच दवाखान्यात खून करण्यात आला. कर्नाटकात खासदाराने डॉक्टरला मारहाण केली तर पुण्यात एका रूग्णाच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवून खुनाचे कलम लावीत तीन प्रथीत यश डॉक्टरांना अटक करण्यात आली. या घटनांमुळे वैद्यकीय व्यावसायिक धास्तावले असून त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

शासनाने वैद्यकीय व्यावसायिकांना सुरक्षा पुरवावी रूग्णाच्या मृत्यूप्रकरणी फौजदारी कायद्यातून डॉक्टरांना वगळावे. तसेच दवाखान्यातील हिंसा प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी या मागण्यांसाठी आयएमएने देशभरात काळी फीत लावून निषेध नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. निवेदन देतांना आयएमएच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवि वानखेडकर, धुळे जिल्हाध्यक्षा डॉ. विजया माळी, कार्यकारी अध्यक्ष डॉ. सविता नाईक, उपाध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव डॉ. पंकज देवरे, डॉ. संदीप बियाणी, डॉ. अनिल रघुवंशी, डॉ. नितीन कुलकर्णी, डॉ. मंदार म्हसकर, डॉ. मीनल वानखेडकर, डॉ. प्रदीप सोनवणे, डॉ. सरिता मुणोत, डॉ. अमित बाफणा, डॉ. दिनेश दहिते आदी उपस्थित होते.