‘कटक’वर विजय अपेक्षित!

0

कटक : भारतीय संघासाठी गेल्या दहा वर्षांत कटकचे बाराबती स्टेडियम प्रचंड लकी ठरलेले आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध गुरुवारी दुसरा वन-डे सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्यानेच टीम इंडिया मैदानात उतरेल. पहिल्या वन-डे लढतीत तीन गडी राखून विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असला तरी गुरुवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या लढतीत ‘दव’ हा घटक निर्णायक ठरणार आहे. दव हा घटक सामन्यात चिंतेचे कारण ठरणार आहे. बुधवारी दुपारी भारतीय संघाचे कटक येथे आगमन झाले आहे. संघाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. स्थानिक क्युरेटरच्या मते दव सायंकाळी ५.३० नंतर पडण्यास सुरुवात होते. सामन्याच्या दिवशीही असेच घडले तर नाणेफेक कौल निर्णायक ठरू शकतो.

बाराबती स्टेडीयम लकी
गेल्या दहा वर्षांत भारताने बाराबती स्टेडियममध्ये खेळलेल्या पाचही वन-डे सामन्यांत विजय मिळविला आहे. त्यापैकी एक लढत भारताने २००८ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. त्यात भारताने ६ गडी राखून सरशी साधली होती. या स्टेडियममध्ये भारताला अखेरचा पराभव नोव्हेंबर २००३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध स्वीकारावा लागला होता. सध्याच्या संघातील केवळ एक सदस्य युवराजसिंग त्या लढतीत खेळला होता. त्यानंतर भारताने या मैदानावर वेस्ट इंडिज व श्रीलंका या संघांविरुद्ध प्रत्येकी दोनदा, तर इंग्लंडचा एकदा पराभव केला आहे. दरम्यान, आॅस्ट्रेलियाविरुद्धची एक लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करावी लागली होती. बाराबतीमध्ये भारताने एकूण १५ सामने खेळले आहेत. त्यापैकी ११ सामने जिंकले, तर चार सामने गमावले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान या मैदानावर आतापर्यंत चार सामने खेळले गेले आणि कामगिरी २-२ अशी आहे.

फलंदाजी क्रमवारीत धोनीची बढती?
महेंद्रसिंग धोनी पहिल्या सामन्यात वरच्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. या स्थानावर फलंदाजी करताना आश्वासक खेळीची अपेक्षा असते. पण धोनी नेटमध्ये ट्वेन्टी-२० सामन्यांना साजेशा अशा आक्रमक फटक्यांचा सराव करताना दिसला. त्याच्या आक्रमक फलंदाजीचा नूर पाहता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनी आणखी वरच्या स्थानावर किंवा पुन्हा एकदा मॅच फिनीशरच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामना जिंकण्याची आवश्यकता आहे. यापार्श्वभूमीवर कटक सामन्यात भारतीय फलंदाजी क्रमवारीत नेमके कोणते बदल पाहायला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. भारतीय संघाचा गुरुवारी दुसरा तर येत्या रविवारी कोलकाता येथे तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर भारतीयस संघ तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेला देखील सामोरे जाणार आहे. कानपूर, नागपूर आणि बंगळुरू येथे तीन ट्वेन्टी-२० सामने होणार आहेत.

बालपणीपासूनच विराटकडे नेतृत्वगुण
कोहलीच्या बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी विराटमध्ये जन्मत: नेतृत्त्वगुण होते, असे म्हटले आहे. कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने अद्याप एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. तर धोनीने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर संघाचे कर्णधारपद कोहलीकडे देण्यात आले आहे. कोहलीने आपल्या पहिल्या कर्णधारी एकदिवसीय सामन्यात शतक ठोकून संघाला विजय प्राप्त करून दिला. राजकुमार म्हणाले की, विराटमध्ये जन्मत: नेतृत्त्वगुण होते. अकादमीकडून खेळताना देखील कोहली संघाचे नेतृत्त्व करायचा. कसोटी संघाचा कर्णधार झाल्यानंतर विराटची कामगिरी आणखी उंचावल्याचे दिसून आले. कोहली सध्या आपल्या सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत आहे आणि आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यायला हवा, असेही ते पुढे म्हणाले.