गुजरातमध्ये उभारणार जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम

0

अहमदाबाद : भारतीय क्रिकेटमध्ये नवनवी स्थित्यंतरे घडताना पहायला मिळत आहेत. यातच आता गुजरातच्या अहमदाबाद शहरात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमच्या निमित्ताने भारताला क्रिकेटमध्ये आणखी नवे नाव मिळणार आहे. या स्टेडियमच्या निर्मितीचे उद्घाटन गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष परिमल नाथवानी यांच्या हस्ते करण्यात आला. तब्बल ७०० कोटींचा अंदाजित खर्च असणारे हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम ठरणार असल्याचा दावा नाथवानी यांनी केला आहे. स्टेडियममध्ये एकूण ७६ कॉर्पोरेट बॉक्स, ४ ड्रेसिंग रुम, क्लब हाऊस, ऑलिम्पिकच्या दर्जाचे स्विमिंग पूल देखील असणार आहे.

दोन वर्षात स्टेडियमची निर्मिती पूर्ण
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियम हे जगातील सध्याचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मानले जाते. मेलबर्न क्रिकेट स्टेडियमची तब्बल ९० हजार प्रेक्षकांची क्षमता आहे. तर कोलकाताचे इडन गार्डन स्टेडियम हे भारतातील सध्याचे सर्वात मोठे स्टेडियम आहे. इडन गार्डन स्टेडियमची आसनक्षमता ६६,००० इतकी आहे. २०१५ सालच्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्यात आलेल्या मेलबर्न क्रिकेट स्टेडियमचे डिझाईन तयार केलेल्या आर्किटेक्ट पॉप्युलर कंपनीलाच अहमदाबादमधील स्टेडियमच्या उभारणीचे काम देण्यात आले आहे. पुढील दोन वर्षात या स्टेडियमची निर्मिती पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

नव्या स्टेडियमची क्षमता १ लाख १० हजार
अहमदाबादमध्ये सध्या सरदार पटेल हे स्टेडियम असून या स्टेडियमवर २०११ सालच्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळविण्यात आला होता. सरदार पटेल स्टेडियमची केवळ ५४ हजार इतकी प्रेक्षक क्षमता आहे. अहमदाबादमध्ये उभारण्यात येणाऱ्या या नव्या स्टेडियमची क्षमता १ लाख १० हजार इतकी असणार आहे. प्रेक्षकांच्या क्षमतेचा विचार करता हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून ओळखले जाणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक संख्या सांभाळून त्यांच्या सुरळीत प्रवेशाचा आणि ट्राफीकच्या समस्या उद्भवणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेऊन या स्टेडियमची रचना करण्यात येत आहे. स्टेडियमची उभारणी तीन टप्प्यात करण्याचा गुजरात क्रिकेट असोसिएशनचा मानस आहे. गुजरातचा क्रिकेटपटू हार्दिक पंड्या यानेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे कौतुक केले आहे.