Private Advt

40 लाखांची ‘एरंडोली’

परवाच एक भन्नाट किस्सा ऐकायला मिळाला, त्यातली गोष्ट असेल साधारण सहा महिन्यांपूर्वीची. एकाने जागा विकायला काढली होती. 28 लाखाचा तगडा रेट निघाला होता. त्यासाठी समोरची पार्टीही तयार झाली. जवळपास सगळं काही पक्कं झालं आणि माशी शिंकली. मध्यस्थाने गडबड केली आणि त्याने पैसे देणारा व घेणारा अशा दोघांनाही बिचकावलं. या मध्यस्थाने 40 लाख देणारी दुसरी मोठी पार्टी व्यवहारात घुसवली आणि 28 लाखवाल्याचा पत्ता पद्धतशीरपणे कट केला. लाखमोलाची जागा आणि पैशाचे ‘भौतिक’ सुख कोणाला नको असतं. इकडची-तिकडची अशा दोनही पार्टी तयार आहेत म्हटल्यावर 100 टक्के कॅशमध्ये व्यवहार झाला म्हणे. बँकेत 50 हजारांच्या वरची रोख रक्कम असेल, तर पॅन क्रमांक लागतो इथे तर थोडेथोडके नव्हे तब्बल 40 लाख असल्याचे समोरचा छातीठोकपणे सांगता होता.

खरे-खोटे माहित नाही पण रंजक आणि कथित गोपनीय माहिती मिळतेय म्हटल्यावर आपणही ऐकून घ्यावे. कुठलाशा व्यवहाराचे स्पष्टीकरण देता आले नाही म्हणून हात धुवून मागे लागलेल्या ‘ईडी’मुळे राज्याचे माजी गृहमंत्री हैराण आहेत आणि आपल्याकडे या लाखांच्या गोष्टीची हाक ना बोंब ! मामला एकदम बिनबोभाट सेट झाला. कारण, सगळे एकच नामसाधर्म्य साधणारे होते म्हणे. समोरच्याकडून हा अफलातून किस्सा ऐकता-ऐकता बा. भ. बोरकरांच्या कवितेमधील ‘गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण ‘अनिल’ गण निघाले’ या ओळी सहजच आठवल्या. बाहेर नुकताच पाऊस होऊन गेला होता. ‘अशोक’ही बहरला होता. हळूवार प्रवेशलेल्या ‘सविता’ अर्थातच ‘सूर्या’मुळे इंद्रधनुष्य आले होते. कुंभातून धो-धो जलवर्षाव झाला होता. कुंभ म्हटला म्हणजे धनाने भरलेला घडा असाही एक अर्थ होतोच.

आताचे आपले भौतिक, व्यावहारिक जगातील धन (चलन) म्हणजे गुलाबी, करड्या, केशरी रंगातील भरमसाठ नोटा… समोरचा सांगता होता. त्याने एकदाचा समारोप केला. अशा कित्येक कथा, किस्से असतात की, त्या समोरच्या व्यक्तीच्या समाधानासाठी ऐकून घ्यायच्या असतात. ‘40 लाखाच्या एरंडोली’चा किस्सा श्रवण केल्याचा आनंद घेत, पेढे खात मीही पुढचा मार्ग धरला. काहीही असो… माहिती भन्नाट होती. त्याचा वापर करून ईडी, आयकर, सीबीआयने खान्देशात एन्ट्री मारली तर मोठे घबाड हाती यायचे आणि चौकशी लागली तर व्यवहाराचे मुसळ केरात जायचे. माझ्याही मनात वीज चमकली.

  • गप्पा-टप्पा