स्वामी विवेकानंदांचे खरे रूप

0

आधुनिक युगात भारतीय भूमीवर जे महापुरुष जन्माला आले त्यात स्वामी विवेकानंदांचा समावेश अगदी निर्विवादपणे करावा लागेल. आयुष्य अवघे 39 वर्षांचे! परंतु एवढ्या छोट्या जीवनपटावरही त्यांचे कार्य वीज चमकावे तसे चमकून गेले. वाट्याला आलेला काळाचा चिमुकला तुकडा त्यांनी अक्षरश: जिवंत, रसरशीत आणि चैतन्यमय केला. ते गेल्यानंतर गेले शतकभर त्यांच्या अजोड व्यासंगाची, ओजस्वी वाणीची आणि जगभर केलेल्या अथक संचाराची चर्चा सतत होत राहिली. भारतीय परंपरेचा त्यांनी अखिल विश्‍वात केलेला उच्चार आणि प्रचार प्रत्येक भारतीयाला अभिमान देत राहिला.

प्रारंभी स्वामी विवेकानंदांसारखे प्रज्ञावंतही या घोटाळ्याचे बळी ठरले. ते स्वत:ला वैदिक मानत. वेदान्ताचे समर्थन करत. परंतु पुढे आयुष्यभर त्यांनी जे कृती कार्यक्रम मांडले ते मात्र वेद व वेदान्तात कुठेही न बसणारे होते. पण वैदिक आहोत, ही धारणा परंपरेने मनात पक्की केलेली असल्यामुळे वेद-वेदान्ताचा जयजयकार करणे त्यांना बाय डिफॉल्ट भाग पडत होते. परंतु त्याच वेळी भारत हे जगातले एक शक्तिशाली, विज्ञानवादी, आधुनिक राष्ट्र बनवायचे असेल तर वेद-वेदान्ताचा उपयोग नाही हेही त्यांच्या लक्षात येत होते. याच मानसिक-वैचारिक द्वंद्वात ते कायम असत. त्यांनी म्हणताना वेद चांगले आहेत असे म्हटले, परंतु त्याचवेळी वेदांचा गाभा असलेल्या यज्ञसंस्कृतीला, त्यातल्या हिंसेला, कर्मकांडांना बेधडक झुगारले. वैदिक परंपरेने संस्कृतीच्या क्षेत्रात शब्दप्रामाण्याचा जो दबदबा उभा केला होता तो त्यांनी निर्धाराने नाकारला आणि ज्ञानाला, बुद्धिप्रामाण्याला प्राधान्य दिले. दु:खमुक्ती, दारिद्रयनिर्मूलन, सेवाभाव, करुणा, परोपकार यासाठी प्रसंगी उपनिषदातील अद्वैत सिद्धान्त खुंटीवर टांगण्याची तयारी दर्शविली. समाजातील सुख-दु:खाशी सोयरसुतक न मानणार्‍या आणि रात्रंदिवस वैयक्तिक मोक्षाच्या पाठीमागे लागलेल्यांची थट्टा केली. ही सर्व लक्षणं वैदिक परंपरेची नव्हती. ती वैदिकांच्या विरोधातील बंडखोरीची होती. तोंडाने ते प्रस्थापित परंपरेची भाषा बोलत होते.परंतु, कृतिकार्यक्रमातून विद्रोह शिलगावत होते. त्यांच्या विद्रोहाचा हा मार्ग बुद्धाच्या महामार्गावर येऊन पोहोचत होता. भारतीय इतिहासात बुद्धमार्ग हा सेवाभाव, करुणा, परोपकार, ऐहिकता, समता यांचा कृतिशील पुरस्कार करत होता. विज्ञान आणि विवेकाची दिशा अनुसरत होता.

शिकागो येथे झालेली सर्वधर्मपरिषद हा विवेकानंदांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा प्रसंग. जणू क्लायमॅक्स! आज सगळेजण विशेषत: हिंदुत्त्ववादी ङ्गविवेकानंदांनी शिकागो येथे हिंदू धर्माच्या श्रेष्ठतेची महती गायलीफ असा गौरव करतात. प्रत्यक्षात, धर्ममार्तंडांनी विवेकानंदांना या परिषदेला जाण्यास विरोध केला होता. विवेकानंद कायस्थ आहेत आणि कायस्थाला धर्मावर बोलण्याचा अधिकार नाही, या कारणास्तव हा विरोध होता. या स्थितीत ते कसेबसे अमेरिकेत पोहचले. इकडे भारतात मात्र त्यांचे निंदासत्र उत्साहात पार पडत होते. धर्मपरिषदेत बोलण्यासाठी ते गेले तेव्हा त्यांना ते हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहेत, असे एकही शिफारसपत्र मिळू शकले नाही. अखेर श्रीलंकेच्या धम्मपाल या विख्यात बौद्ध धर्मगुरूने मध्यस्थी करून त्यांना बोलण्याची संधी मिळवून दिली आणि मग स्वामींनी ती सभा जिंकली.

भाषणाच्या प्रारंभीच काढलेल्या सिस्टर्स अँड ब्रदर्स या उद्गारासरशी उभी सभा हेलावली. केवळ तीन शब्दांनी त्यांनी सभा खिशात घातली होती. काय जादू होती या शब्दांमध्ये? शब्दासारखे शब्द पण भावना अथांग आपुलकीची! ही भावना कुठे होती वेद आणि वेदान्तामध्ये? माणसामाणसांना जोडणारा बंधुत्वभाव ही कुणाची देण होती? प्रेमाचा, आपलेपणाचा हा विचार कुठून आला होता? विवेकानंद कुणाचे विचार जगाच्या वेशीवर मांडत होते? कोणता वसा आणि वारसा सांगत होते?

महात्मा गांधी यांच्याही बाबतीत असेच घडलेले आहे. ते सत्य आणि अहिंसेचे पुजारी होते. विवेकानंदांप्रमाणे तेही स्वत:ची परंपरा वैदिकच मानत. गंमत अशी की, त्यांनी आयुष्यभर प्राणप्रिय मानलेल्या सत्य व अहिंसा या तत्त्वांचा मागमूसही वैदिक परंपरेत आढळत नाही. वैदिक परंपरेत जन्म झालेल्या एखाद्दुसर्‍या माणसाने सत्य, अहिंसा, मानवता सांगणे निराळे आणि त्या परंपरेने अधिकृतपणे याच तत्त्वांचा हिरिरीने पुरस्कार करणे निराळे! प्रत्येक परंपरेत अपवाद असतातच. या अपवादांचे उदात्तीकरण न करता त्या त्या परंपरेत मुख्य आणि मान्यताप्राप्त काय मानले जाते, हे पाहिले पाहिजे. वैदिक परंपरा ही यज्ञसंस्कृतीवर उभी होती आणि हिंसा हा या संस्कृतीचा प्राणभूत घटक होता. याच परंपरेने सत्य ही संकल्पनाही धाब्यावर बसवली. जे वैदिक धर्मशास्त्रांना सुसंगत असेल तेच सत्य आणि तेच अंतिम अशी सत्याची सोईस्कर व्याख्या केली. अनुभवाला, चिकित्सेला, विज्ञानाला (म्हणजे खर्‍या सत्याला) तेथे किंमत नव्हती. विशिष्ट मंडळींना विद्या, धन, प्रतिष्ठा यासारखे उदंड विशेषाधिकार आणि उर्वरित लोकांच्या नशिबी क्रमाक्रमाने अप्रतिष्ठा, गरिबी, गुलामी हे या संस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्य होते. या व्यवस्थेलाच धर्म संबोधण्यात येत असे. या अमानवी विषमतावादी धर्मव्यवस्थेचा वैदिक संस्कृतीने वर्षानुवर्षे पुरस्कार केला. असे असताना गांधींसारख्या सत्य, अहिंसा, मानवतेच्या महान पुजार्‍याला स्वत:चा वारसा मात्र वैदिक परंपरेचा सांगावा लागत होता. ही विसंगती विवेकानंदांसारखीच होती.

– संदीप सारंग
9773289599