नव्य विक्रमांनी गाजला पुण्यातील पहिला सामना

0

पुणे: भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवारी झालेला पहिला एकदिवसीय सामना विक्रमांचा पाऊस पाडणारा ठरला. कर्णधार विराट कोहली आणि घरच्या मैदानावर खेळत असलेला पुणेकर केदार जाधवने या सामन्यात विक्रमांची बरसात केली. सामन्याचे मानकरी ठरलेले विराट आणि केदार जाधवने पहिल्यांदाच पुण्यात होत असलेल्या सामन्यात प्रेक्षकांना आनंदाची पर्वणीच दिली.

विराटचे तीन विक्रम
विराट कोहलीने पूर्णवेळ कर्णधार म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्याच सामन्यात शतक फटकावण्याची किमया विराटने साधली. तसेच त्याने आव्हानाचा पाठलाग करताना पुन्हा एकदा शतकी खेळी केली, धावांचा पाठलाग करतानाचे विराटचे हे 17 वे शतक ठरले. त्याबरोबरच धावांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकरने फटकावलेल्या 17 शतकांच्या विक्रमाशीही विराटने बरोबरी साधली.

पाचव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी
351 धावांचा पाठलाग करताना भारताचे चार खंदे फलंदाज झटपट माघारी परतल्यावर विराट कोहलीने केदार जाधवसोबत भारताचा डाव सावरला. विराट आणि केदारने पाचव्या गड्यासाठी 200 धावांची भागीदारी केली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एकदिवसीय सामन्यात पाचव्या गड्यासाठी द्विशतकी भागीदारी होण्याची ही पहिलीच वेळ. त्यांनी रोहित शर्मा आणि महेंद्र सिंग धोनीने पाचव्या गड्यासाठी केलेल्या 167 धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला.

चौथी मोठी धावसंख्या ‘चेस’
विराट आणि केदारने शानदार शतके फटकावताना केलेल्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने 350 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची किमया साधली. भारताने आज फटकावलेल्या 356 धावा आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना रचलेली चौथी सर्वात मोठी धावसंख्या ठरली. याआधी दक्षिण आफ्रिकेने 2006 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 438, त्यानंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2016 साली दर्बान येथे दुसऱ्या डावात 372 धावा कुटल्या होत्या. तर भारतीय संघाने 2013 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध आव्हानाचा पाठलाग करताना जयपूर येथे 362 धावा कुटल्या होत्या.

केदारने ठोकले जलद शतक
मराठमोळ्या केदार जाधवने ७६ चेंडूमध्ये १२ चौकार आणि चार षटकार मारत १२० धावा केल्या. केवळ ६५ चेंडूमध्ये केदार याने शतक झळकावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जलदगतीने शतक ठोकणाऱ्या भारतीयांच्या यादीत केदार पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. केदार जाधवच्या आधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने ५२ चेंडूमध्ये शतक झळकवले होते. त्यानंतर युवराज सिंह याने ६४ चेंडूमध्ये, वीरेंद्र सेहवाग याने ६० चेंडूमध्ये शतक झळकवले होते. तर ६१ चेंडूमध्ये पुन्हा एकदा विराट कोहलीनेच शतक झळकवले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जलदगतीने शतक झळकावण्याचा विक्रम करणा-या भारतीय खेळाडूंच्या यादीत आता केदारचे नाव आले आहे.