कोरोनाच्या नवीन प्रकाराचे 38 रुग्ण भारतात

0

नवी दिल्ली – ब्रिटनमध्ये नव्याने आढळून आलेल्या कोरोना (corona) च्या नवीन विषाणू (new strain) ने बाधित 38 रुग्ण हे भारता (india) मध्ये निष्पन्न झाले आहेत, अशी माहिती सोमवारी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने देण्यात आली. कोरोनाचा नवीन विषाणू हा आधीपेक्षा 70 टक्के वेगाने संक्रमित होतो. त्यामुळे त्याला प्रतिबंधासाठी सरकार काटेकोर काळजी घेत आहे. 7 जानेवारीपर्यंत ब्रिटनची विमानसेवा निलंबित करण्यात आली असून, अन्य देशातून येणार्‍या विमान प्रवाशांवरही आरटीपीसीआर तपासणी, क्वारंटाईन यासारखी बंधने घालण्यात आली आहेत. दरम्यान, कोरोनाला प्रतिबंध करणार्‍या लसी (vaccine) ह्या नवीन विषाणूलाही रोखू शकतील, असा विश्‍वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, या सर्व 38 रूग्णांना संबंधित राज्य सरकारांनी विहित केलेल्या वैद्यकीय केंद्रांमध्ये अथवा विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे. 38 प्रकरणांपैकी पाच नमुने दिल्लीतील नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल सेंटरमध्ये, 11 दिल्लीतील जेनोमिक्स अ‍ॅण्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी आणि कोलकाताच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्स येथे तपासले गेले आहेत. याशिवाय पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) येथे पाच, सेल्युलर अ‍ॅण्ड मॉलीक्यूलर बॉयलॉजी, हैदराबाद येथे तीन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अ‍ॅण्ड न्यूरो सायन्सेस हॉस्पिटल (एनआयएमएचएनएस), बंगलोर येथे 10 नमुने घेण्यात आले होते.

अनेक राज्यात शाळा-महाविद्यालये सुरू
सोमवारपासून (दि.1 जानेवारी) कित्येक महिन्यांच्या अंतरानंतर अनेक राज्यात शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू झाली. सामाजिक अंतराचे पालन, मास्क, तापमान मोजणी व सॅनिटायझेशन आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. 2020-21 शैक्षणिक सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केरळ आणि कर्नाटकमध्ये 1 जानेवारीला शाळा उघडल्या, तर बिहार आणि पुडुचेरीमधील शाळा 4 जानेवारीपासून उघडण्यात आल्या. बिहारमधील शाळांमध्ये 50 टक्के उपस्थितीसह नववी ते बारावीचे वर्ग चालवले जात आहेत, तर महाविद्यालयांमध्ये अंतिम वर्षाचे वर्ग सुरू केले गेले आहेत. बिहारमधील शालेय मुलांना प्रत्येकी दोन मुखवटे वाटप करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

 

Copy