दुषित पाणी अखेर अडविले

0

जनशक्तिने वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाला आली जाग
(जनशक्ती इम्पैक्ट)
तातडीने उपाय योजना करत खाणले शोषखड्डे

नवापूर : शहरातील लाखाणी पार्क परिसरातील गटारीतील पाणी नवापूरनगरीला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊस जवळील मुख्य विहिरीत जाऊन ते मिसळत होते. या विषयी जनशक्तिने वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून तातडीने उपाय योजना केली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रंगावली नदी पाञातील विहिरीत जाणाऱ्या गटारीचा पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला आहे. तर सांडपाण्यासाठी तातडीने शोषखड्डा तयार करण्यात आला आहे.

लाखाणी पार्क परिसरातील गटारीतील पाणी नवापूरनगरीला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊस जवळील मुख्य विहिरीत जाऊन ते मिसळत होते. याविषयी नागरिकांनी तसेच राजकीय पक्षांनी आवाज उठवला होता. याबाबत जनशक्तीने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाला जेरीस आणले होते. त्यानंतर नगर प्रशासन खडबडून जागे झाले असून देवळफळी भागातील लोकांनी यानंतर आवाज उठवला. पाणी प्रश्न गंभीर बनल्यानंतर जाऊन भाजपा व शिवसेनेने देखील निवेदन दिले. यामुळे प्रशासन व लाखाणी पार्क संचालक यांना जाग आली. काल थेट लाखाणी पार्कच्या संचालकांनी तातडीने उपाय योजना केली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रंगावली नदी पाञातील विहिरीत जाणाऱ्या गटारीचा पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला आहे. सांडपाण्यासाठी तातडीने शोषखड्डा तयार करण्यात येऊन पेटलेले पाणी या उपाययोजनेमुळे तूर्तास शांत झाले आहे.

शहरातील लाखाणी पार्क भागातील सुमारे शेकडो घरांचे सांडपाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊस जवळील विहीरीत मिसळत असल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. माञ नगर पालिका प्रशासनाचा गावी हा प्रकार माहित नव्हता, देवळफळी भागातील लोकांनी या प्रकरणी मुख्याधिकारी यांना घेराव घालून जाब विचारला होता. त्यावर नगर पालिकेने तात्पुरती उपाय योजना करून नोटीसा दिल्या. त्यानंतर रंगावली नदी पाञात जाणारा गटारीचा पाण्याचा प्रवाह बंद करून गटारीच्या पाण्याची विल्हेवाट करण्यासाठी लाखाणी पार्क चा संचालकांनी जेसीबी मशीन ने मोठया आकारातील शोषखड्डा तयार केला आहे. पाईपलाईन फोडून पाणी वळवले आहे.

नदीकडे जाणारे गटारीचे पाणी आता शोषखड्ड्यात जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर पडदा पडला आहे या उपाय योजनेमुळे लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. तरी तात्पुरत्या स्वरूपात सध्या उपाय योजना केली असली तरी लाखाणी पार्क भागात सुमारे शेकडो कुटुंब राहत आहेत. भविष्यात ही घरे आणखी वाढतील त्यामुळे नगर पालिकेने या भागात कायम स्वरूपी योजना केली पाहिजे अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. तो खोदलेला खड्डा लवकर पाण्याने भरला जातो आहे त्यावर आणखी उपाय करणे गरजेचे आहे. नगर पालिकेने याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे