डिक्की फोडणारा अट्टल गुन्हेगार अखेर अटकेत

0

जळगाव । गेल्या दोन ते अडीच वर्षापूर्वी शहरातील सराफ बाजार परिसरातून दुचाकीची डिक्की फोडून पैसे लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणातील फरार संशयितास विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये तयार करण्यात आलेल्या पथकाने शनिवारी रात्री 10.30 वाजता भजे गल्ली येथून अटक केली. दरम्यान, संशयित हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द एआयडीसी, चाळीसगाव, भुसावळ, चोपडा, सिल्लोड, नाशिक, धुळे अश्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

सराफ बाजारातील दागिना कॉर्नर दुकानाजवळून सन 2014 मध्ये अज्ञातांनी दुचाकीची डिक्की फोडून पैसे लांबविले होते. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला होता.  पोलीसांनी डिक्की फोडल्याप्रकरणी अजय उर्फ अज्या व हाड्या या दोन संशयितांना अटक केली होती. तर यातील तिसरा संशयित गोपाल संजू नेतलेकर वय-21 रा.कं जरवाडा हा घटनेपासूनच फरार होता. त्याचा गेल्या काही दिवसांपासून पोलीस शोध घेत होते.

भजे गल्लीतून अटक
अटक पंधरवाडा मोहिम राबविण्यात येत असून या मोहिमेतंर्गत डिक्की फोडीतील फरार संशयितास पकडण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये डिवायएसपी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी एपीआय दिपक गंधाले, पोना.वियजसिंग पाटील, पोना. अनिल घुले, पोना. मिलिंद कंक, पोना. राजेश मेढे, शरद पाटील, धर्मेंद ठाकूर यांचे पथक तयार करण्यात आले. सायंकाळीच संशयित गोपाल संजू नेरकर याच्याविषयी पथकास गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या नुसार पथकाने शनिवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास शहरातील भजे गल्ली येथे सापळा रचून अट्टल गुन्हेगार गोपाल नेरकर याला अटक केली. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबूली पथकाला दिली. त्याला पुढील कारवाईसाठी पथकाने शनिपेठ पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. नेरकर याच्याविरूध्द जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. तर त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.