माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातही ‘डेटागिरी’चा भ्रष्टाचार’

0

हार्डडिस्क असो पेनड्राइव्ह असो की स्मार्टफोन, कॉम्प्युटर, अनेकदा डेटा करप्शनचे नोटिफिकेशन स्क्रीनवर झळकते आणि सारे कसे सुन्न होते. मोठ्या कष्टाने गोळा केलेला डेटा करप्ट झाला की आपला चेहरा उतरतो. गोदामाला कीड लागली की मनाची जी अवस्था होते अगदी तशीच काहीशी अवस्था हे नोटिफिकेशन पाहिले की होते. माहिती आणि तंत्रज्ञानाचे हे युग विलक्षण आहे. आता मूलभूत गरजांमध्येही तंत्रज्ञानाने शिरकाव केलेला आहे. पण त्यासोबतच माहिती बाळगणे आणि साठवून ठेवणे महत्त्वाचे झाले आहे. ही माहिती कोणत्याही स्वरूपातली असू शकते. उदा. गाणी, व्हिडीओ, फोटोज, महत्त्वाची कागदपत्रे, अ‍ॅप्स वगैरे प्रकारात मोडणारी ही माहिती किंवा सोप्या शब्दात ज्याला ‘डेटा’ म्हणतात ही एक प्रकारची साधनसंपत्तीच आहे. असा हा डेटा साठवून ठेवणे आणि त्याची देवाण-घेवाण करणे हे आता अगदी सहज होणारे काम आहे. यासाठी खास उपकरणेही आहेत. यूएसबी पेनड्राइव्ह असेल पोर्टेबल हार्डडिस्क असेल किंवा सध्या फारशा वापरात नसलेल्या सीडी-डीव्हीडीज असतील. (पूर्वी डेटा स्टोअरेजसाठी फ्लॉपी डिस्क वापरली जात होती.) या डेटाचे स्टोअरेज करणारी ही एक प्रकारची गोडाऊन्स आहेत आणि अनेकदा अडचण होते ती या गोदामांना धक्का पोहोचला की…

फाइल करप्शन किंवा डेटा करप्शन म्हणजे काय?
या प्रकाराचा खरा अर्थ म्हणजे फाइल किंवा डेटामध्ये होणारे अनपेक्षित बदल. फाइल किंवा डेटाच्या कोडमध्ये होणार्‍या बदलांमुळे हे करप्शन होत असते. बहुतांशवेळा डेटा तयार होत असताना, देवाण-घेवाण होत असताना किंवा प्रोसेस होत असतानाच डेटा करप्ट होण्याची शक्यता जास्त असते. असा करप्ट झालेला डेटा पुन्हा मिळवता येतो का? तर याचे उत्तर आहे हो. परंतु, सर्वच डेटा रिकव्हर करता येण्याची शक्यता मात्र कमी असते.

सिस्टम रिस्टोअरचा एक पर्याय स्मार्टफोन्स तसेच कॉम्प्युटरच्या बाबतीत वापरता येऊ शकतो. परंतु, त्यामुळे नुकताच सेव्ह केलेला डेटा पुसला जाण्याची शक्यता असते. शिवाय हे करताना अनेकदा फॅक्टरी रिस्टोअरचाच पर्याय असतो. त्यामुळे स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटर थेट अश्मयुगात जाण्याची शक्यता असते. अर्थात पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागते. त्यामुळेच उपाययोजना करण्याऐवजी जर का डेटा काळजीपूर्वक हाताळला तर अधिक उत्तम. शेवटी मोठ्या कष्टाने मिळवलेला डेटा गमावण्यापेक्षा तो नीट सांभाळणे अधिक चांगले.

मानवी चुका : मेमरी कार्ड कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोनला कनेक्ट करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे अनेकदा ते अ‍ॅक्सेस होत नाही. त्यामुळे त्यावरचा महत्त्वाचा डेटा, फाइल्स ओपन करता येत नाहीत. या अशा चुकीच्या कनेक्शन तसेच डिसकनेक्शनमुळेही डेटा करप्ट होण्याची शक्यता असते. अनेकदा चुकून मेमरी कार्डच फॉरमॅट होऊन जाते. अशा वेळी त्यावर असणारा सगळाच्या सगळा डेटाच खोडला जाण्याची भीती असते.

सॉफ्टवेअरचा घोळ : मेमरी कार्डवर असणारा डेटा किंवा फाइल्स आणि कॉम्प्युटर, स्मार्टफोनवर असणारी सॉफ्टवेअर्स, अ‍ॅप्स किंवा ऑपरेटिंग सिस्टीम जर का कम्पॅटिबल म्हणजेच एकमेकांशी सुसंगत नसतील तर डेटा किंवा फाइल्स करप्ट होऊ शकतात. त्यामुळे मेमरी कार्डवर डेटा घेताना कम्पॅटिबिलिटी तपासणे महत्त्वाचे असते.
व्हायरस इन्फेक्शन : बहुतांशवेळी डेटा करप्ट होण्यामागे व्हायरस हे एकच कारण असते. एका कॉम्प्युटरमधून किंवा स्मार्टफोनमधून मेमरी कार्डवर डेटा कॉपी करताना व्हायरस फाइलही अनवधानाने कॉपी होते आणि मग डेटा करप्ट व्हायला सुरुवात होते. अनेकदा व्हायरस इनफेक्टेड कॉम्प्युटरला मेमरी कार्ड जोडलेले असते, त्यातूनही व्हायरस कार्डात शिरण्याची शक्यता असते.

हार्डवेअरचे नुकसान : मेमरी कार्डलाच जर का इजा पोहोचलेली असेल तर मग साहजिकच डेटा करप्शन होऊ शकतो. मेमरी कार्डावरच्या सर्किट बोर्डला धक्का लागला असेल तर मग कितीही काहीही केले तरी डेटा करप्ट होणारच आणि अशा परिस्थितीत मग तो डेटा परत मिळवणे कठीण होऊन जाते. करप्ट झालेला किंवा डीलीट झालेला डेटा 100 टक्के परत मिळवणे अशक्य असते. तसा दावा करणारे अनेक अ‍ॅप्स किंवा सॉफ्टवेअर्स आहेत. फाइल रिपेअर, रिकुव्हा, अनडीलीट बिटा, गुटेनसॉफ्ट डेटा रिकव्हरी, डीडीआर डेटा रिकव्हरी, मायजॅड अ‍ॅण्ड्रॉइड डेटा रिकव्हरीसारखी असंख्य अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. पण यापैकी कुठलेही अ‍ॅप गेलेला सगळ्याचा सगळा डेटा पुन्हा मिळवू शकत नाही. काही प्रमाणात फाइल्स, डेटा नक्कीच मिळवता येईल.

– सुनील आढाव
कला संपादक, ‘जनशक्ति’