धुळ्यातील शेतकर्‍यांना मिळणार 39 कोटी

0

धुळे । 2015 च्या खरिप हंगामात कापुस पिकाला उत्पादनात आलेल्या तुटीमुळे युती सरकारचे तत्कालीन कृषीमंत्री एकनाथराव खडसे यांनी जाहिर केलेल्या अनुदानाची रक्कम अद्याप अप्राप्त होती. सदर अनुदान नासिक विभागीय आयुक्तांनी नुकतेच धुळे जिल्ह्याकडे वर्ग केले आहे. सदर अनुदान पात्र लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यावर आठवडाभरात वर्ग केले जाणार असल्याची माहिती माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्याच्या वाट्याला येणारे 38 कोटी 88 लाख 45 हजार रुपये तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करा अशा आशयाचे निवेदन पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री चंद्रकांत पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे दिले होते.

माजी मंत्री खडसे यांनी जाहीर केली होती मदत
खरिप हंगाम 2015 मध्ये शेतकर्‍यांनी धुळे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात कापसाची लागवड केली होती. मात्र गतवर्षी धुळे जिल्ह्यासकट राज्यात कोरडा दुष्काळ पडल्याने कापुस पिकाच्या उत्पादनात मोठ्याप्रमाणात घट आल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. शिवाय गेल्या वर्षी कापसाला रुपये 4200 पेक्षा अधिकचा भाव खुल्या बाजारातही न मिळाल्यामुळे कापुस उत्पादक शेतकरी पार खचून गेला होता. राज्यातील कापुस उत्पादकांवरील संकट लक्षात घेता तत्कालीन कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कापुस उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी 11 हजार रुपये अनुदान जाहिर केले होते. मात्र रक्कम राज्यभरात अप्राप्त असल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली होती. खरीप हंगाम 2015 ची थकीत अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या हातात पडत असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. अनुदान धुळे जिल्ह्याकडे वर्ग झाल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधी केला वर्ग
धुळे जिल्ह्यातील कापुस पिका खालील सन 2015 चे बाधीत क्षेत्रातील 1 लाख 73 हजार 890 एवढे असून सुमारे 1 लाख 62 हजार 484 खातेदार शेतकर्‍यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. धुळे जिल्ह्याचे एकूण 38 कोटी 88 लाख 85 हजार एवढे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग होत आहे. या अनुदानाबाबत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने 25 जुलै 2016 रोजी महसुल आयुक्त, नासिक यांना पत्र पाठवून सदर निधी धुळे जिल्ह्याला वर्ग करा अशी मागणी केली होती.