परीक्षा अन् मार्कांनीच बुद्धिमत्ता ठरत नाही; टॅलेंट ओळखा

0

चाळीसगाव : जातीपातीत फूट पाडण्याचे कारस्थान थांबवा बुद्धिमत्ता प्रत्येकात आहे. बुद्धिमत्ता कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळखा. केवळ परीक्षा अन् मार्कांनीच बुद्धिमत्ता ठरत नसते. त्यामुळे स्वत:मधील टॅलेण्ट ओळखा. प्रत्येक जण त्याच्या आवडत्या क्षेत्रात राजा बनू शकतो. त्यामुळे कधीही जीवनात नैराश्य आणू नका. अन्यथा जीवन जगणेच कठीण होईल, असे विचार भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी सनदी (आय.ए.एस.) अधिकारी, विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांनी ’उमंग’ व्याख्यानमालेत व्यक्त केले.

आमदार उन्मेष पाटील यांची उपस्थिती
’उमंग’ व्याख्यामालेत ’जिंकणारा समाज घडवण्यासाठी’ या विषयावर धर्माधिकारी यांनी द्वितीय पुष्प गुंफले. ’उमंग’च्या संस्थापिका संपदा पाटील यांनी धर्माधिकारी यांचा सत्कार केला. व्यासपीठावर आमदार उन्मेष पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, नारायण बंकट वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.ल.वि.पाठक, भाजपचे पालिकेतील गटनेते राजेंद्र चौधरी, घृष्णेश्वर पाटील अगदी उपस्थित होते.

आपल्या क्षेत्रात राजा बना
सर्पदंश झालेल्या हजारो रुग्णांना जीवदान देणारे सर्पमित्र राजेश ठोंबरे यांचा उल्लेखनिय कार्याबद्दल सत्कार धर्माधिकारी यांच्याहस्ते झाला. धर्माधिकारी म्हणाले की, भारत देशाचा सेवक ही पदवी आय.ए.एस.पेक्षा मोठी आहे. जातीजातीत फूट पाडण्याचे कारस्थान थांबायला हवे. स्वत:च्या जीवनाचे नेतृत्व स्वत:च करा. अन् तुमच्या क्षेत्रात राजा बनण्याचा प्रयत्न करा.

चांगल्या कार्याची मशाल प्रज्वलीत ठेवा
धर्माधिकारी यांनी पुढे सांगितले की, चांगल्या कामाचा यज्ञ पेटवा आपले कर्म चांगले असावे. कर्माचा यज्ञ चांगला असेल तर समाजात ताठ मानेने जगता येते. त्यांनी युवकांना आत्महत्या करण्याचा विचार मनात आणू नका असा सल्लाचा दिला. तसेच दगडालाही आकार देता येतो. त्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार करण्यापूर्वी ही बाब लक्षात असू द्या. युवकांनी उद्याचा भारत घडवण्यासाठी चांगल्या कार्याची मशाल कायम प्रज्वलीत ठेवावी. तरुणांनी याचा निश्चित विचार करावा.