रावणाच्या अहंकाराप्रमाणे धोनीच्या गर्विष्ठपणाची आता अखेर!

0

नवी दिल्ली: रावणाच्या अहंकाराची ज्याप्रमाणे योग्यवेळी माती झाली. त्याचप्रमाणे धोनीच्या गर्विष्ठपणाची आता अखेर होत आहे आणि युवराजच्या कष्टाची दखल घेण्यास सुरूवात झाली आहे, असे म्हणत युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी पुन्हा धोनीला लक्ष्य केले आहे. धोनीविरोधात कोणीही तक्रार केली तर त्या खेळाडूच्या मनात धोनीबद्दल असूया असल्याचे म्हटले जायचे. पण आता हळूहळू सर्वांना सत्य लवकरच कळेल. गेल्या काही महिन्यांपासून धोनीकडून चांगली कामगिरी होत नाहीय असे मला वाटते. त्याचा अहंकार हळूहळू मोडीस निघत आहे, असेही योगराज म्हणाले.

युवीच्याही लक्षात येईल
युवराजला आपण याआधी देखील धोनीमुळेच तुझे संघातील स्थान गेल्याचा सांगितले होते. संघात तुझ्या पाठिशी कुणीच उभे राहणार नाही. तू फक्त आपल्या कामगिरीवर लक्षकेंद्रीत कर, असे आपण सांगितले होते. युवराजने केवळ आपल्या कामगिरीकडे लक्ष दिले आणि त्याचे फळ त्याला मिळाले. लग्न करतेवेळी देखील मी युवराजला लग्न केलेस तरी क्रिकेटपासून दूर जाऊ नकोस, मेहनत सुरू ठेव. एक दिवस धोनी नक्कीच निवृत्त होईल आणि संघाचे दार तुझ्यासाठी उघडेल, असे सांगितले होते. आज अगदी तसेच होत आहे. धोनीकडून नेतृत्त्वाची जबाबदारी आता कोहलीकडे गेली आणि युवराजचे संघात पुनरागमन झाले. युवी माझ्या बोलण्याकडे इतके लक्ष देत नाही. पण त्याला मी योग्य असल्याची जाणीव होईल, असेही योगराज पुढे म्हणाले.

कोहलीचे केले कौतुक
योगराज यांनी यावेळी कोहलीचे कौतुक केले. युवराजचा केवळ एक फलंदाज म्हणून नाही, तर गोलंदाजीतही कोहली त्याचा चांगला उपयोग करून घेईल. कारण कोहली धोनीसारखा नाही किंवा धोनीसारखी चूक कोहली करणार नाही. युवराज एक चांगला गोलंदाज आहे आणि संघाला विजय हवा असेल तर युवीकडून गोलंदाजीही करून घ्यायला हवी, असे योगराज यांनी सांगितले. युवराज सिंग याने तब्बल तीन वर्षांनंतर भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन केले असून पुण्यात होणाऱया इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात युवीचा अंतिम अकरा खेळाडूंमध्येही समावेश होण्याची दाट शक्यता आहे. युवराजच्या पुनरागमनावर त्याचे वडील योगराज सिंग देखील खूश आहेत.

संघात अंतर्गत राजकारण
युवीच्या पुनरागमनानंतर त्यांनी धोनीवर पुन्हा एकदा निशाणा साधला. धोनीने संघाचे नेतृत्त्व सोडले, की युवीचे भारतीय संघात पुनरागमन होईल, असे भाकीत मी दोन वर्षांपूर्वीच केले होते, असे योगराज सिंग म्हणाले. आज अगदी तसेच झाले आहे. धोनी संघाच्या कर्णधारपदी नसताना युवीला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. ते म्हणाले की, अगदी खरं सांगतो. मी हे भाकित दोन वर्षांपूर्वीच केले होते. हवं तर माझे याआधीच्या मुलाखती तपासून पाहा. धोनीला युवराज अजिबात आवडत नाही. संघात अंतर्गत राजकारण असल्याचे मी याआधीच सांगितले होते.