कॅशिअरने काढली ग्राहकाच्या खात्यातून १९ लाखांची रोकड!

0

शिंदखेडा: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शिंदखेडा शाखेच्या कॅशिअरने ग्राहकाच्या खात्यातून परस्पर १९ लाखांची रोकड लंपास करुन डल्ला मारल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी बँकेच्या कॅशिअरविरुध्द शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. किशोर दगडु पटेल यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शिंदखेडा शाखेत बचत खाते आहे. शिंदखेडा बँक शाखेचे कॅशिअर दत्तात्रय विठ्ठल बेडसे याने पटेल यांच्या खात्यातून दि.२२ ऑगस्ट २०१५ ते १३ जानेवारी २०१६ या कालावधीत १० लाख १६ हजार रुपये तसेच एप्रिल २०१६ ते २३ मे २०१६ या कालावधीत ८ लाख ४४ हजार रुपये असे एकूण १८ लाख ६० हजार रुपये परस्पर काढून घेतले.

शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल
हा प्रकार खातेधारक पटेल यांच्या लक्षात आला. त्यांनी बँक प्रशासनाकडे शिंदखेडा स्टेट बँक ऑफ इंडियात कॅशियरने केला १९ लाखांचा अपहार तक्रार केली. या प्रकरणाची चौकशी झाली. त्यात कॅशिअर बेडसे यांनी सदरच्या रकमेचा परस्पर अपहार केल्याचे उघड झाले. त्यानंतर मात्र कॅशिअर बेडसेने दि.२६ मे २०१६ रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शिंदखेडा येथील शाखेत ८ लाख ४४ हजार रुपये, २६ मे २०१६ रोजी शिरपूर शाखेत ९ लाख रुपये व दि.२७ मे २०१६ रोजी १ लाख ५४ हजार रुपयांचा परस्पर भरणा करुन या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतू, बँक प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. याप्रकरणी शिंदखेडा बँकेचे अधिकारी सुहास मधुकर पिसु यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कॅशिअर दत्तात्रय विठ्ठल बेडसे यांच्याविरुध्द शिंदखेडा पोलिसात भादंवि कलम ४०६,४०९ अन्वये गुन्हा दाखल झाला. पुढील तपास सपोनि पोतदार करीत आहेत.