Private Advt

यंदाही थर्टी फर्स्ट घरातच? हॉटेलचालकांची वाढली चिंता

जळगाव : बसून साजरा करावा लागणार का ? या प्रश्नाने संपूर्ण हॉटेल व्यावसायिकांची झोप उडवली आहे. कोरोना आता जगातून संपला या मानसिकतेत संपूर्ण जनता असताना आता ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटने पुन्हा एकदा जगभर दहशत निर्माण केली आहे.यामुळे हॉटेलचालकांची चिंता वाढली आहे.

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आबालवृद्ध सज्ज झाले आहेत. सर्वत्र थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनचे नियोजन सुरू आहे. त्यातच मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे सेलिब्रेशनवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने घरीच सेलिब्रेशन करावे लागले. यंदा कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने नववर्षाचे स्वागत जल्लोषात होईल, अशी अपेक्षा असताना कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटने डोके वर काढले आहे. जगभरात ओमायक्रॉनची दहशत पसरल्याने नववर्ष स्वागतावर यंदाही निर्बंध येतील की काय? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच प्रशासनाने अद्याप नियमावली जाहीर केलेली नाही.

कोट्यवधींच्या उलाढालीचा प्रश्न

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी शहरातील नामांकित हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये बुकिंग सुरू आहे. याशिवाय इतर छोट्या-मोठ्या हॉटेलमध्ये देखील मोठी गर्दी होत असते. त्यामुळे या एका दिवसात कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र, प्रशासनाने सेलिब्रेशनवर निर्बंध लादल्यास या उलाढालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते.