31 कलाकार सादर करणार आपला कलाविष्कार

0

‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यावर्षी 12 ते 16 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलात

पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यावर्षी 12 ते 16 डिसेंबर या पाच दिवसांदरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथील नव्या जागेवर पहिल्यादांच होणार आहे.

औरंगाबादचे कल्याण अपार यांच्या सनई वादनाने 12 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता महोत्सवाला सुरुवात होणार असून तब्बल 31 कलाकार आपला कलाविष्कार सादर करतील. देशातील दिग्गज कलाकारांबरोबरच युवा पिढीतील कलाकारांचा सहभाग असणार असल्याची माहिती श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गुरुवार, दि. 13 डिसेंबरला बनारस घराण्याच्या डॉ. रिता देव यांचे गायन होईल. सुप्रसिद्ध गायक पं. अजय पोहनकर यांच्या गायनाने सांगता होईल. शुक्रवार, 14 डिसेंबरला ग्वाल्हेर-जयपूर घराण्याच्या अपर्णा पणशीकर यांच्या गायनाने सुरुवात होईल. पंजाबच्या रागी बलवंत सिंग यांचे गायन होणार आहे. ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांचे गायन होईल. शनिवार, 15 डिसेंबर रोजी बंगळुरूचे दत्तात्रय वेलणकर यांच्या गायनाने महोत्सव सुरू होईल. गायिका सावनी शेंडे यांच्या गायनानं तर विवेक सोनार यांचे बासरीवादन होणार आहे. श्रीनिवास जोशी गायन सादर करतील. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी किराणा घराण्याचे गायकबंधू अर्शद अली व अमजद अली यांचे सहगायन होईल. गायक संजीव अभ्यंकर यांचे गायन होईल. प्रतिक चौधरी हे सतारवादन करतील. यानंतर शास्वती सेन यांची कथक प्रस्तुती होईल. परंपरेप्रमाणे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होईल.